शाळापूर्व तयारी संदर्भात मनपा मुख्याध्यापक, शिक्षकांची सभा
नागपूर :- समाजात शिक्षकांना सन्मानपूर्वक दर्जा आहे. एक शिक्षक केवळ शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतच नाही तर विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे कार्य करतो. आजचे विद्यार्थी उद्याचे समजातील सुजान नागरिक आहेत. विद्यार्थ्यांच्या रुपात हा समाज घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे, असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
शैक्षणिक सत्र २०२३-२४च्या अनुषंगाने शाळापूर्व तयारी संदर्भात मनपाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांची सभा मंगळवारी (ता.२७) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. या सभेमध्ये अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ अजय गुल्हाणे बोलत होते. मंचावर शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, मनपा उपायुक्त सुरेश बगळे, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, सहायक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुभाष उपासे, सहायक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय दिघोरे, सहायक कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, आकांक्षा फाउंडेशनच्या सीनिअर डायरेक्टर जयश्री ओबेरॉय, सोमसूर्व चॅटर्जी आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अजय गुल्हाणे यांनी इतिहासातील शिक्षकांचे उदाहरण देताना सांगितले की, तत्कालीन समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, सामाजिक मूल्य, स्त्री शिक्षण यामध्ये परिवर्तन घडविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान होते. आज स्पर्धेच्या युगात आजच्या शिक्षकांकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. या सर्व अपेक्षांना मनपाचे शिक्षक खरे उतरतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागणे हे शिक्षण विभागाचे यश असल्याचे अजय गुल्हाणे म्हणाले. विद्यार्थ्यांमधील गुण, त्यांचा कल ओळखून त्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थी स्वत:ला ओळखून स्वत:च ज्ञान आत्मसात करू शकेल, अशी शिक्षण प्रणाली अवलंबिण्याविषयी विचार करण्याची सूचना देखील अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाणे यांनी यावेळी केली.
शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी मनपा शाळांमधील शिक्षणाचा दर्जा, स्थिती, चांगल्या बाबी, सुधारणा आणि विविध टप्प्यांवर आवश्यक प्रयोग यासंदर्भात संवाद साधला. मनपा शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी पटसंख्या वाढीसह शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच क्रीडा विषयक विकासाबाबत सूचना केल्या. मनपाच्या सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळावेत याबाबत कटाक्षाने काळजी घेण्याचेही शिक्षणाधिका-यांनी यावेळी नमूद केले.
आकांक्षा फाउंडेशनच्या सीनिअर डायरेक्टर जयश्री ओबेरॉय यांनी शाळांचा गुणात्मक आणि संख्यात्मक दर्जा उंचावण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी आकांक्षा फाउंडेशनद्वारे सुरू असलेल्या कामांचा उहापोह केला. सहायक कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार यांनी शाळापूर्व तयारीच्या दृष्टीने करावयाची कामे तसेच शासनाचे निर्देश, परिपत्रक याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन मनपाच्या शिक्षिका शुभांगी पोहरे आणि मधु पराड यांनी केले.
सत्र २०२१ आणि २०२२ मधील गुणवंतांचा गौरव
शैक्षणिक सत्र २०२१ आणि २०२२ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रत्येकी दोन ग्रॅम सोन्याचे नाणे आणि धनादेश (प्रथम, व्दितीय व तृतीय – २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपये) प्रदान करून गुणवंतांचे कौतुक करण्यात आले.