नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती कारागृह आणि पाटबंधारे विभागाच्या मधील मनपाच्या मालकीच्या जागेवर कचरा संकलित करणाऱ्या गाड्यांच्या पार्किंग व्यवस्थेकरिता व कचरा व्यवस्थापनाकरिता नियोजित जागेच्या संदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.८) पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, कार्यकारी अभियंता पंकज पराशर, लक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी रामभाऊ तिडके उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कचरा संकलित करणाऱ्या गाड्यांच्या पार्किंग व्यवस्थेकरिता व कचरा व्यवस्थापनाकरिता मध्यवर्ती कारागृह आणि पाटबंधारे विभागाच्या मधील मनपाच्या मालकीच्या जागेवर असलेल्या या नियोजित जागेची पाहणी केली. सध्या ऑरेंज सिटी स्ट्रीट येथे एजी एन्व्हायरो या एजन्सींद्वारे ठिकठिकाणाहून जमा केलेला कचरा संकलन करून भांडेवाडीला नेण्यात येतो. परंतु ऑरेंज सिटी स्ट्रीट येथे जागेची अडचण असल्यामुळे कचरा संकलित करणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था मध्यवर्ती कारागृहच्या जागा आणि पाटबंधारे विभागाच्या जागेच्या मधोमध मनपाच्या मालकीच्या जागेवर करण्यात येणार आहे.
येथे जमिनीवर कचरा असणार नाही छोट्या गाडीमधीलचा कचरा मोठया गाडीमध्ये ट्रांसफर करून तो भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे नेला जाईल. ही संपूर्ण जागा एक हेक्टर मध्ये पसरलेली असून येथे मोठा रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच गाड्यांच्या पार्किंगकरिता शेड देखील बनविण्यात येणार आहे.या संपूर्ण परिसरात कुठलाही कचरा टाकला किंवा जमा करून ठेवण्यात येणार नाही तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देखील यावेळी आयुक्तांनी दिले.
यावेळी आयुक्तांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षण केले. व्यवस्थितरीत्या कचरा संकलनासाठी नियोजन करण्यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने त्यांनी अधिकाऱ्यांना व विभागाला निर्देश दिले.