– पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश अन् शालेय साहित्य
नागपूर :- उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शुक्रवार (ता३०) पासून नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बच्चे कंपनीचा किलबिलाट पुन्हा ऐकू येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळा सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक सत्रात पुन्हा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक आणि इतर शालेय साहित्य वाटप केल्या येणार असल्याची माहिती मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी दिली.
मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी सांगितले, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार येत्या शुक्रवार ३० जून पासून नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १३५ शाळा सुरू होत आहेत. यात १०० प्राथमिक व उच्च प्राथमिक, २९ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि आकांक्षा फाउंडेशनद्वारा संचालित ६ शाळांचा समावेश आहे. मनपाच्या शाळांमध्ये जवळपास १५ हजार ९३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात इयत्ता पहिली ते आठवी मध्ये जवळपास ११ हजार ३९९ इतके विद्यार्थी असून, इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये ३ हजार ६०० विद्यार्थीं शिकत आहेत. तसेच आकांक्षा फाउंडेशन द्वारा संचालित शाळांमध्ये ज्युनिअर के.जी. के.जी १, के. जी. २ अशा वर्गांमध्ये ९३२ विद्यार्थी आपले प्राथमिक शिक्षण घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नागपूर महानगरपालिकेचा शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता मनपाच्या सर्व शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविल्या जातात. या माध्यमांतून एक सुजाण नागरिक घडविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी सांगितले.
शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेश तर इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना गणवेश, जे. के. जी ते के. जी. २ च्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक आणि गणवेश दिला जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शाळा निरीक्षक, समग्र शिक्षण अधिकारी, संसाधन व्यक्ती(Resource person) हे मनपाच्या विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. असे ही शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर यांनी सांगितले.