शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विकसित करावे – राज्यपाल रमेश बैस 

राज्यातील गडकिल्ल्यांच्या रक्षणाचे अभियान सुरु करण्याची राज्यपालांची सूचना

मुंबई :-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. राज्याची ओळख व अस्तित्व शिवाजी महाराजांमुळे आहे, असे सांगताना ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्याने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट तयार करण्याची योजना हाती घ्यावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी देखील अभियान सुरु करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई ते दुर्गराज रायगड येथे सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेला शुक्रवारी (दि. २६) राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन मुंबई येथून झेंडी दाखवून रवाना केले, त्यावेळी ते बोलत होते.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सुनील पवार व बाळंभट व भिकमभट यांचे १७ वे वंशज महंत सुधीरदास महाराज यांसह शिवप्रेमी उपस्थित होते.  छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. महाराज द्रष्टे होते. ईस्ट इंडिया कंपनीचे मनसुबे तसेच औरंगझेबाकडून होणारे संभाव्य धोके त्यांनी पूर्वीच ओळखले व आरमाराची निर्मिती केली असे राज्यपालांनी सांगितले. शिवाजी महाराजांचे धोरण व्यापार उदिमाला चालना देणारे होते व महिलांचा त्यांनी नेहमी आदर केला असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी देशभरातील विविध नद्या व सरोवरातून संकलित केलेल्या सहस्त्र जलकलशांचे राज्यपालांच्या हस्ते पूजन करण्यात आले. हे जलकलश शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वापरले जाणार आहे. 

प्रभू रामाच्या अस्तित्वाने पुलकित अश्या बाणगंगा क्षेत्राच्या सन्निध असलेल्या राजभवनातून सहस्त्र जलकलश यात्रेला आरंभ होत आहे याबद्दल आनंद व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला हे आपले भाग्य असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. रायगड येथे दिनांक २ जून रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नद्यांचे पवित्र जल वापरले जाणार असल्याचे सांगून शिवाजी महाराजांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

महंत सुधीरदास महाराज यांनी यावेळी राज्यपालांना जलकलश पूजा विधी सांगितला. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत लहान मुले व युवकांनी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com