भाजप संपू शकते काय? 

वरील प्रश्नार्थक हेडिंग वाचून बहुतेक सर्व वाचकांना व मतदारांना धक्का बसल्यासारखे होईल आणि विशेषतः भाजपच्या मतदारांना तर हा लेख तर्कहीन व तर्कदृष्ट आहे असेही वाटण्याचा संभव आहे. पण भाजप संपू शकतो ही वस्तुस्थिती आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला 240 जागांवर स्वबळावर विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला स्वबळावर 99 जागांवर विजय मिळाला आहे असे निकाल सांगतो. पण या निकालाच अधिक सखोल विश्लेषण केले असता वेगळीच वस्तुस्थिती बाहेर येते. भाजपच्या 240 जागांमध्ये सात नवनिर्वाचित खासदार केवळ 200 च्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत तर 23 खासदारांचे मताधिक्य 500 मतांच्या आसपास आहे. याचबरोबर 1000 पर्यंत मताधिक्य असलेले 49 खासदार आहेत तर तब्बल 86 खासदार 2000 च्या फरकाने विजयी झाले आहेत. या सगळ्या खासदारांची बेरीज 165 येते. याचा अर्थ भाजपचे 240 पैकी फक्त 75 खासदार हे 2000 पेक्षा जास्त फरकाने विजयी झाले आहेत.

लोकसभेचा एक मतदार संघ हा साधारणपणे 15 लाखापासून ते 25 लाखापर्यंत असतो एवढ्या मोठ्या मतदार संघामध्ये पाचशे हजार मतांनी जिंकणे हे खरे तर पराभवाचे लक्षण आहे.

त्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपचे फक्त 165 एवढेच खासदार निवडून आले आहेत. गेल्या वेळच्या 303 खासदारांच्या तुलनेत ही संख्या तब्बल 138 ने घटली आहे हा भाजपसाठी मोठा सेटबैक आहे.

याचा सरळ अर्थ असा आहे की या निवडणूकीत भाजपचे स्वतःचे मतदार मोठ्या प्रमाणात घटले आहेत व त्याच वेळी भाजपच्या विरोधी असलेल्या मतदारांची संख्या प्रचंड वाढली आहे. ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

अधिक सखोल विश्लेषण केले तर असे लक्षात येते की भाजप संसदीय पार्टीचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी या मतदार घटण्यासाठी प्रत्यक्षपणे जबाबदार आहे. याचे कारण असे की गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वात भाजपने सर्वधर्मसमभावाचे धोरण पूर्णपणे बाजूला टाकलेले आहे आणि कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला आहे आणि हे मतदारांना आवडलेले नाही त्यामुळे सर्वच जाती-धर्माचे मतदार भाजपपासून दूर जात आहेत. हे वास्तव या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे उघडकीस आलेले आहे. त्यामुळे भाजपने जर केवळ हिंदुत्वाचाच पुरस्कार भविष्यात सुरू ठेवला तर भाजपच्या मतदारांची संख्या आणखी घटू शकते व तो पक्ष संपू शकतो असे या निकालाचे विश्लेषण करावे लागेल.

याचबरोबर काँग्रेसने गेल्या वेळच्या 52 जागांवरून 99 जागांपर्यंत जी मुसंडी मारलेली आहे ती अतिशय लक्षणीय आहे. याचे कारण असे की गेल्या दहा वर्षात मोदींच्या खोटया वलयामुळे मतदारांनी काँग्रेसला जवळपास पूर्णपणे नाकारले होते. परंतु गेल्या दहा वर्षात मोदी फक्त बोलघेवडेपणा करू शकतात प्रत्यक्षात देशाची प्रगती करू शकत नाहीत ही जाणीव झाल्यामुळे काँग्रेसकडे मतदार पुन्हा परत आले आहेत, असा त्याचा अर्थ आहे.

खरे तर भाजप जवळ स्वतः चे असे स्वतंत्र आर्थिक धोरण नाही. कधी ते ‘स्वदेशी’चा पुरस्कार करतात तर कधी याच्या अगदी विरुद्ध अशा ‘मेक ईन इंडिया’ची गोष्ट करतात. त्यामुळे भाजप सत्तेत आला की त्यांच्या पंतप्रधानाच्या धोरणाप्रमाणे आर्थिक धोरण लागू केले जाते. यापूर्वी भाजपचे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी डॉ मनमोहन सिंगाचेच उदारीकरणाचे आर्थिक धोरण स्वीकारले होते व स्वतः वाजपेयी हे कटटर हिंदुत्ववादी नव्हते, त्यामुळे देशाचे फारसे आर्थिक नुकसान झाले नव्हते. परंतु 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी बहुमताच्या जोरावर आपले स्वतःचे हिंदुत्ववादी आर्थिक धोरण लागू केले व ते आर्थिक धोरण देशासाठी मात्र आत्मघातकी ठरले. देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था यासाठी केवळ मोदींचे आत्मघातकी आर्थिक धोरण जबाबदार आहे, हे सर्वच अर्थतज्ञ मानतात. वाढती महागाई व बेरोजगारी, घटलेले औद्योगिक उत्पादन व प्रतिव्यक्ती उत्पन्नही मोदींच्या कार्यकाळाची देणगी आहे. आणि हे अपयश लपविण्यासाठी जनतेला भारत जगात आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे/आला आहे अशी तददन खोटी वस्तूस्थिती जनतेपुढे मांडून जनतेची दिशाभूल करण्याचे पाप मोदींनी केले आहे.

ही सर्व मखलाशी, त्यातील अप्रामाणिकपणा आणि मोदींची मुजोरी हे सर्व आता जनतेला कळले आहे. त्यामुळे भाजपची मते कमी होऊन, काँग्रेसची मते वाढत आहेत. भविष्यात हे असे सुरू राहिले तर काँग्रेसची मते आणखी वाढणार आहेत कारण तो सुरुवातीपासून धर्मनिरपेक्षता मानणारा पक्ष आहे. हा संकेत भाजपसाठी फार महत्त्वाचा ठरावा व भाजपने यापासून धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याचा धडा घ्यावा अशी असे हे विश्लेषण सांगते.

भाजपने ते केले नाही तर पुन्हा मते घटून तो पक्ष नामशेष होऊ शकतो हेही लक्षात घ्यावे.

भारतामध्ये कटटर हिंदुत्व हे धोरण कधीच यशस्वी होऊ शकत नाही कारण देशाची पारंपरिक घडी धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. याच्या विरुद्ध जाऊन मोदी हिंदुत्वाच्या आधारे 2047च्या विकसित भारताचे स्वप्न दाखवत आहेत. भारताच्या पारंपारिक धर्म निरपेक्षतेशी छेडछाड करणे हे कुठल्याही राजकीय पक्षाला विशेषतः भाजपला महाग पडू शकते असाही या निकालाचा अर्थ आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

Mon Jun 10 , 2024
पुणे :- पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज, 08 जून 2024 रोजी पदवीप्रदान (स्क्रोल प्रेझेन्टेशन) समारंभपार पडला. या कार्यक्रमात लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, (परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक,) जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न कमांड यांनी एम टेक आणि तांत्रिक प्रवेश योजना (TES) अभ्यासक्रम अधिकाऱ्यांना संबोधित केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com