सी-20 परिषद : नागपूर विमानतळ परिसरात सुशोभिकरणाला गती

नागपूर :- नागपूर शहरात 20 ते 22 मार्च 2023 दरम्यान जी-20 परिषदेंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या सी-20 परिषदेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळपरिसरात सुशोभिकरणाच्या कामांना गती आली आहे. आकर्षक वृक्षांची लागवड, राष्ट्रध्वजांसाठी उभारण्यात आलेले खांब, परिसरातील भिंतीवर चितारण्यात येत असलेली आकर्षक चित्रे आदी कामे गतीने सुरु आहेत.   

सी-20 परिषदेसाठी येणाऱ्या देश-विदेशातील प्रतिनिधींचे आगमन येथील विमानतळावर होणार आहे. या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळ परिसर सज्ज होत आहे. महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरणाने विमानतळ परिसरात सुशोभिकरणाच्या कामाला गती दिली आहे.

विमानतळातून बाहेर पडल्यापासून जवळपास 1 कि.मी. अंतरापर्यंतच्या परिसरात विविध प्रजातींची फुलझाडे लावण्यात येत आहेत. विमानतळातून बाहेर पडताच लावण्यात आलेल्‍या नाम फलकाखालील परिसरात वर्तुळाकार, त्रिकोणी आणि वेटोळया आकाराची टॉपअरी झाडे लावण्यात येत आहेत. विमानतळापासून प्राईड हॉटेल पर्यंतच्या जवळपास 1 कि.मी. अंतरापर्यंतच्या रस्याच्या दुभाजकावर मालाफिजीया ही वेटोळया आकारातील वृक्ष लावण्यात आली आहेत. याच रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी जी-20 परिषदेच्या सदस्य राष्ट्रांचे ध्वज लावण्यासाठी दुतर्फा ध्वजांचे खांब उभारण्यात आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा 8 ते 9 फुट उंचीचे कोणाकार्पस वृक्ष लावण्यात येत आहेत. रंगीबेरंगी फुलांची 3 मिटर रुंद आणि जवळपास 1 कि.मी. लांबीची पुष्पपट्टीकाही लावण्यात येत आहे.

टर्मिनल मेनडोम परिसरात टायगर कॅपीटल आणि संत्रानगरी ही नागपूरची ओळख दर्शविणाऱ्या आकर्षक प्रतिमा येथे साकारण्यात येणार आहेत. तसेच व्हर्टीकल गार्डन, जी-20 च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय भाषेत नागपुरात आपले स्वागत आहे हा संदेश असणारे मोठे फलक उभारण्यात येणार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com