महाराष्ट्रातील भाजपाचा महाविजय देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणारा! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार

शिर्डी :- काही निवडणुका देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणाऱ्या असतात. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील हा महाविजय देशाच्या राजकारणास नवी दिशा देणारा ठरणार असून याची इतिहासात नोंद होणार आहे. पक्षाचे समर्पित कार्यकर्ते हे या महाविजयाचे खरे शिल्पकार आहेत. या देशात सिद्धान्ताची राजनीतीच चालेल हे दाखवून परिवारवादी राजकारणास महाराष्ट्राने जोरदार चपराक लगावली आहे. महाराष्ट्रातील हा महाविजय म्हणजे कार्यकर्त्यांचे समर्पण आणि मेहनतीचे फळ असून यापुढेही भाजपाच्या विजययात्रेत महाराष्ट्र सर्वात पुढे राहील असा विश्वास व्यक्त करत भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपाच्या महाविजय मेळाव्यात महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्ते, नेते व मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाच्या प्रारंभी अमित शाह म्हणाले, महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. शिवाजी महाराजांपासून सावरकर, टिळक व अनेक राष्ट्रपुरुषांचे स्मरण करून शहा यांनी महाराष्ट्रातील महाविजयाबद्दल कारकर्त्यांचे अभिनंदन केले. शरद पवार यांनी 1978 पासून सुरू केलेल्या दगाफटक्याची राजनीती 20 फूट जमिनीखाली गाडली आहे. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये बाळासाहेबांची विचारधारा सोडून दगा देत खोटारडेपणाने मुख्यमंत्रीपद मिळविले, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, महाराष्ट्राच्या विजयातून एक मजबूत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार देण्याचे काम महाराष्ट्राच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी केले आहे, असे ते म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीआधी शरद पवार पत्रकारांना निकालाचे भविष्य समजावून सांगत होते, आता निवडणुकीत काय झाले ते मी शरद पवार यांना समजावून सांगतो, असे सांगत अमित शहा यांनी राज्यातील भाजपाच्या महाविजयाची महाराष्ट्रातील विभागवार यादीच वाचून दाखविली. आमच्या सहयोगी पक्षांनाही या महाविजयातून महाराष्ट्राच्या जनतेने मजबूत केले असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी आहे, हेही सिद्ध केले आहे, धोकेबाजीची राजनीती करणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घरी बसविण्याचे काम केले आहे, अशा शब्दांत त्यांनी या महाविजयाची प्रशंसा केली.

महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीच्या राजनीतीला मान्यता दिली, सनातन संस्कृतीचा स्वीकार केला, हे सिद्ध झाले. 2024 च्या वर्षातच मोदीजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, हरियाणात आपण सलग तिसरा विजय प्राप्त केला, याच वर्षात आंध्रात प्रथमच रालोआचा विजय झाला, ओरिसामध्ये प्रथमच पूर्ण बहुमताचे आपले सरकार स्थापन झाले, 2024 च्या वर्षातच तिसऱ्यांदा सिक्कीममध्ये एनडीएला विजय मिळाला आणि त्याच वर्षात महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांचा सत्ता मिळाली. हे वर्ष भाजपाच्या इतिहासात नोंदले जाईल, पण आम्ही एवढ्यावर थांबणार नाही. आमचा बूथवरचा प्रत्येक योद्धा कार्यकर्ता हाच आमचा सेनापती आहे. महाराष्ट्रातील संघटनपर्व काहीशा विलंबाने सुरू झाले आहे. 40 लाख सदस्य झाले आहेत, दीड कोटींचे लक्ष्य आहे. कार्यकर्त्यांनी यासाठी कटिबद्ध राहून येत्या दीड महिन्यांत दीड कोटींहून अधिक सदस्य बनवावेत आणि प्रत्येक बूथचे शक्तिकेंद्रात परिवर्तन करावे, असे आवाहनही शहा यांनी केले. येत्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना एकही जागेवर विजय मिळणार नाही याची खबरदारी घ्या. संपूर्ण विजय हाच खरा विजय असतो. विरोधकांना एकही जागेवर विजय मिळू न देता पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत सर्वत्र विजयाचे सूत्रधार व्हावे यासाठी आपण एकत्र आलो आहोत. तो प्राप्त करणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक जागेवर विजय आणि प्रत्येक नागरिकास सदस्यत्व हा संकल्पही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.मजबूत भाजपा हे कार्यकर्त्यांचे लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. पन्नाप्रमुखापासून बूथ अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्षापर्यंत प्रत्येकाने आपली सारी शक्ती संघटनेसाठी पणाला लावावी, लाडक्या बहिणी, शेतकरी, या सर्वांना सदस्य बनवू, आणि भविष्यात कोणीही आपला विश्वासघात करण्याची हिंमत करणार नाही अशी मजबूत पक्षउभारणी करून सर्वत्र भाजपाला विजयी करू व राष्ट्र प्रथम हा संकल्प साकार करू या असे आवाहनही त्यांनी केले.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सोडला होता. आता दुसऱ्या कार्यकाळात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस मिळून हा संकल्प पूर्ण करतील, प्रत्येक शेतात सिंचनाचे पाणी खेळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले, पण त्यांना जे जमले नाही, ते आम्ही करून दाखविणार आहोत. आम्ही जे बोलतो, ते करून दाखवितो, ही आमच्या पक्षाची परंपरा आहे. विरोधकांनी आता पाहातच रहावे, असे आव्हानही त्यांनी दिले. आम्ही दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे. अयोध्येतील रामलल्लाची मुक्तता करण्याची ग्वाही आम्ही दिली होती, कलम 370 समाप्त करण्याची ग्वाही दिली होती, ती पूर्ण केली आहे, देशातून दहशतवाद संपविला, 31 मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवादही संपवू अशी ग्वाही त्यांनी दिली. गरीब कल्याण हा आमचा संकल्प आहे. सात कोटी गरीबांना घर, गॅस, वीज धान्य, पाणी आणि आरोग्य सुविधा देण्याचे कामही भाजपाने केले आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले, ही सेनापती बापट यांची काव्यपंक्ती उद्धृत करून शहा म्हणाले, महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे. गडचिरोली, शक्तिपीठ महामार्ग, पुणे मुंबई मेट्रो विकास, समृद्धी महामार्ग, सांगली, जालना, संभाजीनगरातील विकास अशी अनेक कामे पाच वर्षांत भाजपा पूर्ण करून राज्याला समृद्ध करेल, यात शंका बाळगू नका, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दुसरीकडे इंडिया आघाडीत दुफळी माजली आहे, संपूर्ण इंडिया आघाडी खिळखिळी झाली असून महाराष्ट्रातील भाजपाच्या महाविजयामुळेच त्यांचा आत्मविश्वास संपला आहे. मोदीच्या नेतृत्वात भाजपा एकामागून एक विजय मिळवत असून दिल्लीतही भाजपाचे सरकार येईल. 2024 ची अखेर भाजपाच्या विजयाने झाली, आणि 2025 ची सुरुवातही भाजपाच्या विजयानेच होईल. 2047 पर्यंत भारत हे संपूर्ण विकसित, सुरक्षित, समृद्ध राष्ट्र हा संकल्प आहे. विकसित महाराष्ट्राखेरीज हे स्वप्न साकार होणार नाही. कारण महाराष्ट्र आणि मुंबई हे विकासाचे केंद्र आहे. येत्या भविष्यकाळात मोदीजींच्या नेतृवात असा महाराष्ट्र घडवू, आणि विश्वासघात करण्याची कोणाची हिंमतही होणार नाही, असे आवाहन करून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. विजयाची ही यात्रा अशीच अखंडपणे सुरू राहील, आणि महाराष्ट्रातही भाजपा अजेय ठरेल, असा विश्वास व्यक्त करून, अखेरीस पुन्हा एकदा अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खासदार क्रीडा महोत्सव खो - खो स्पर्धेचे भव्य उद्घाटन

Mon Jan 13 , 2025
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार खासदार क्रीडा महोत्सव 2025 अंतर्गत विदर्भ स्तरीय खो खो स्पर्धेचे उद्घाटन रविवार दि. 12 जानेवारी 2025 ला मानकापूर स्टेडियम येथे थाटात पार पडले. प्रमुख अतिथि म्हणुन भाजप संपर्क प्रमुख ठाकरे होते. विशेष अतिथि म्हणुन क्रीडा उपसंचालक शेखर पाटिल, प्रदीप मंडलेकर, विदर्भ खो-खो संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुहास पांडे, नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!