मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवासाच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

मुंबई :- ‘दि मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृहाच्या तथा आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तूच्या कोनशीलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ.राजेंद्र भागवत आदींसह विधानमंडळ तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या वास्तूचे अत्याधुनिकरण आणि सुशोभिकरण येत्या 18 महिन्यांत पूर्ण करणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.

फोर्टमधील ‘दि मॅजेस्टिक’ वास्तू ही ग्रेड 2 ए हेरिटेज इमारत असून ती वास्तव्यास धोकादायक झाली आहे. तिचे संवर्धन करणे आवश्क असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या इमारतीचे नुतनीकरण करण्यात येत आहे. हे नूतनीकरण करताना या हेरिटेज वास्तूला कोणताही धक्का लावण्यात येणार नाही.

या इमारतीच्या नवीन आराखड्यानुसार तळमजल्यावर भव्य प्रवेशद्वार आणि स्वागत कक्ष, जेवण, कॉफी शॉप त्याचबरोबर मल्टी क्युझिन रेस्टॉरंट असेल. पहिल्या मजल्यावर दिव्यांग अतिथींसाठी युनिव्हर्सल सूट आणि जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनीयुक्त अशा 72 डिलक्स आणि सुपर डिलक्स अतिथी खोल्या आणि सूट प्रस्तावित आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर कार्यालये प्रस्तावित केली आहेत, तर चौथ्या मजल्यावर प्रेसिडेंशियल सूट प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे गच्चीवर बँकेट हॉल, तर तळघरात कर्मचाऱ्यांसाठी खोल्या प्रस्तावित करण्यात आले आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com