महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला – अजित पवार

‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी…

कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवरील भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध

मुंबई :- मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारने खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असे आवाहनही अजित पवार यांनी सरकारला केले.

कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्रसरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीने सीमाभागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे आहेत. सत्तारुढ पक्षांनीही आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे. अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडसावले आहे.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com