अस्मिता योजना पुन्हा सुरू करणार – मंत्री गिरीश महाजन

मुंबई : अस्मिता योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच ही योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्या नमिता मुंदडा यांनी राज्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली. महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत महिला व किशोरवयीन मुलींना एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची प्रक्रिया सुलभ पद्धतीने करण्यासाठी सर्व महिला आमदारांसोबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्या प्रा. वर्षा गायकवाड, डॉ. भारती लव्हेकर, सुलभा खोडके, यामिनी जाधव, सदस्य हसन मुश्रीफ, राजेश टोपे यांनी सहभाग घेतला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com