महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोराम राज्य स्थापना दिवस साजरा

– उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरणाबद्दल राज्यपालांची होमी भाभा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शाबासकी

– विदेशात जाण्यापूर्वी उत्तर पूर्वेचे सौंदर्य पाहण्याचे आवाहन

मुंबई :- अटल बिहारी वाजपेयी सरकार मध्ये मंत्री तसेच संसदीय समित्यांचा सदस्य या नात्याने आपण उत्तर पूर्वेतील प्रत्येक राज्यांना भेट दिली आहे. तेथील नैसर्गिक सौंदर्य जगातील सुंदर देशांना तोडीस तोड देणारे आहे. पर्यटनासाठी विदेशात जाण्यापूर्वी आपण उत्तर पूर्व राज्यांना भेट दिली तर तेथील पर्यटन वाढेल व लोकांमधील राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २० फेब्रुवारी) महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालय व एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोक गीत व नृत्यांचा सांस्कृतिक बहारदार कार्यक्रम सादर केला.

सूर्योदय पाहावयाचा असल्यास प्रथम अरुणाचल प्रदेश राज्याकडे पहावे लागते. त्या राज्यात लोक परस्परांना शुभेच्छा देताना ‘जय हिंद’ म्हणतात ही गोष्ट उल्लेखनीय असल्याचे राज्यपालांनी सांगितले.   

आपण त्रिपुरा राज्यातील एका लहानश्या गावाला भेट दिली होती. तेथील स्वच्छता व प्रत्येक घरासमोरील फुलांची वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण थक्क झालो होतो, असे सांगून उत्तर पूर्व राज्यांच्या विकासाकरिता गेल्या दहा वर्षांमध्ये कसोशीने प्रयत्न झाले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत देशातील विविध राजभवनांमध्ये वेगवेगळ्या राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे करण्यात येत असून महाराष्ट्रात आतापर्यंत १८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे करण्यात आले. या उपक्रमामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांची कला, संस्कृती, परंपरा व नृत्य यांमधील समृद्धी पाहण्यास मिळाली, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

सिडनहॅम व एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही राज्यांच्या लोकगीत व नृत्यावर सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. राज्यपाल बैस यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थी कलाकारांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ले. जन. के टी. परनाईक (नि) यांचा अरुणाचल प्रदेश स्थापना दिनानिमित्त व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत तसेच विद्यापीठांतर्गत एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान संस्था व सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई या महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री शिंदे सरकारने मराठा समाजाला खरा न्याय देणारा निर्णय - जयदीप कवाडे

Wed Feb 21 , 2024
– सरकारचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अभिनंदन मुंबई/नागपुर :- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील राज्य सरकारने आरक्षणात 10 टक्के वाटा देऊन पूर्ण केली. मराठा आरक्षणावर शिंदे सरकारने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी स्वागत केले. मंगळवारी महायुतीच्या राज्य सरकारने विशेष अधिवेशनात विधेयकाला मंजुरी दिल्याने मराठा समाजाला खरा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com