पशुसंवर्धन विभागाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविले

नागपूर : ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेतर्गत दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभाची निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ऑनलाईन पध्दतीने https//ah.mahabms.com या संकेतस्थळावर AH MAHABMS या अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशनमध्ये अर्ज भरण्यासाठी 11 जानेवारी 2023 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 असा आहे.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांश माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

शासनाने एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीसाठी नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

@ फाईल फोटो

NewsToday24x7

Next Post

भिवापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदासाठी भर्ती

Sat Dec 17 , 2022
नागपूर :- भिवापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय शिल्प निदेशकाचे फळे भाज्या संस्करण एक पद तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार असून त्यासाठी शासकीय दराने मानधन देण्यात येणार आहे. व्यवसाय शिल्प निदेशकासाठी संबंधित व्यवसायातील द्वितीय श्रेणीमध्ये पदविका उत्तीर्ण असल्यास अनुभवाची आवश्यकता नाही. संबंधित व्यवसायातील नॅशनल अप्रेटिस सर्टिफिकेट किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्राचे एस.सी.व्ही.टी. सर्टिफिकेट असल्यास प्रशिक्षणासह चार […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com