उद्यान विभागाचे स्तुत्य कार्य : ५ हजारावर विविध प्रजातींची झाडे : आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर, ता. १३ : वाढत्या शहरीकरणातही नागपूर शहराची हिरवे नागपूर, सुंदर नागपूर ही ओळख अबाधित ठेवण्यात नागपूर महानगरपालिका सदैव प्रयत्नरत् आहे. नागपूर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून झाडांची संख्या वाढविली जात आहे. त्यामुळे शहरात हिरवळ वाढत आहेच शिवाय नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन सुद्धा मिळत आहे. याच कार्याच्या श्रृंखलेत मनपाच्या उद्यान विभागाने केलेल्या स्तुत्य कार्याचे फलीत मिळाले आहे. शिवणगाव भागात ३ वर्षापूर्वी उद्यान विभागाद्वारे करण्यात आलेल्या वृक्षलागवडीने परिसरात मोठे अमृत वन निर्माण झाले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी वेळोवेळी या उद्यानासंदर्भात आढावा घेउन येथील देखरेख आणि व्यवस्थापनाकडे लक्ष दिले आहे. त्यांच्या निर्देशानुसार उद्यान विभागाद्वारे आवश्यक कार्यवाही करून सदर उद्यान आज वनआच्छादन म्हणून निर्माण होत आहे. नुकतेच मनपा आयुक्तांनी सदर उद्यानाची पाहणी केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, उपायुक्त रविन्द्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे शिवणगाव भागातील १२१०० चौरस मीटर जागेमध्ये ५० पेक्षा जास्त प्रजातींची ५ हजारावर झाडे लावण्यात आली आहेत. येथे लावलेल्या झाडांची तीन वर्षात चांगलीच वाढ झाली असून येणा-या काळात हा संपूर्ण परिसर विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडांनी बहरून निघणार आहे. शिवाय येथील वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करून सभोवतालचे वातावरण आल्हाददायी करण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहेत.
शिवणगाव भागातील या उद्यानाच्या प्रवेश मार्गावर आकर्षक पद्धतीने पाम आणि विद्येच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय बाजूलाच चाफा, कनक चाफा, डिस्मेरियन पाम, जास्वंद, गुलाब अशी विविध फुलांची झाडे लक्ष वेधून घेत या भागाच्या सौंदर्यात भर घालतात. उद्यानात मोठ्या प्रमाणात पिंपळ, आपटा, कदंब, कडूनिंबाची झाडे लावण्यात आलेली आहेत. रामफळ, आंबा, चिकु, डाळींब, पेरू, सीताफळ, बोर, जांभुळ अशी बरीच फळझाडे सुद्धा लावण्यात आलेली आहेत.
परिसरात निर्माण झालेल्या फळ आणि फुलझाडांच्या वनआच्छादनाने परिसरात पशु, पक्ष्यांसाठी मोठा निवारा निर्माण केला आहे. उद्यानात खारुताईच्या मुक्त संचारासोबतच झाडांवर विविध पक्ष्यांची घरटी दिसून येत असून पक्ष्यांचा किलबिलाट हा सुखावय अनुभव देतो. लाफींग डव, बुलबुल, ग्रीन बी ईटर, सनबर्ड, लार्ज ग्रे बॅबलर, इंडियन लाबिंग यासारखे अनेक पक्षी तसेच मोर हा राष्ट्रीय पक्षी सुध्दा येथे दिसून येतात. भागात लावण्यात आलेली फुलझाडे, फळझाडे बहरल्यानंतर या परिसरात आणखी पक्ष्यांची संख्या वाढून हे स्थळ पक्ष्यांसाठी नंदनवनच ठरेल, अशी आशा उद्यान विभागाद्वारे वर्तविण्यात आली आहे.