देशात उष्माघातामुळे होणाऱ्या बळींची संख्या शून्यावर आणण्याचे ध्येय – कुणाल सत्यार्थी

मुंबई : “जगात उष्माघाताचे सर्वात जास्त प्रमाण भारतात आहे. यावर उपाययोजनांबाबत दोन दिवसीय कार्यशाळेत सखोल चर्चा झाली असून यंदा भारतात उष्माघातामुळे होणाऱ्या बळींची संख्या शून्यावर आणण्यासाठी शासन, संस्था, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, सामाजिक घटक सर्वांनी मिळून काम करू”, असे आवाहन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी यांनी केले.

‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आयआयटी पवई येथे करण्यात आले होते. त्याच्या समारोपीय चर्चासत्रात  सत्यार्थी बोलत होते.

देशातील विविध राज्यांतील व महाराष्ट्रातील विविध शासकीय अधिकारी आणि तज्ज्ञ यांनी उष्णतेच्या लाटांविषयी संशोधन, अभ्यास आणि उपाययोजनांबाबत कार्यशाळेत आपले मत मांडले.

उष्ण लहरींच्या वाढत्या प्रभावाने मनुष्यजातीचे शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा विविध पद्धतीने नुकसान होताना दिसत आहे. उष्णतेच्या बचावासाठी असलेल्या कृती आराखड्याबरोबरच माहितीचा प्रसार, पायाभूत सुविधा, वर्तणूक, संस्थापक क्षमता निर्माण करणे, तांत्रिक, नैसर्गिक घटकांचा वापर करुन उष्माघातापासून बचाव कसा करता येऊ शकेल, यावर या चर्चासत्रात चर्चा करण्यात आली.

उष्ण लहरी शमविण्यासाठी राज्य शासनाच्या कृती आराखड्याची पुनर्रचना आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ग्रामीण भागात उष्ण लहरींमुळे प्रभावीत होणाऱ्या पिकांसाठी उपाययोजना सांगाव्यात, शेती, जनावरे आणि कामगार वर्गामध्ये जातील जास्त माहिती पोहचविल्यासाठी प्रयत्न करावेत, शहरांमध्ये ‘उष्ण लहरींबाबत सर्व माहिती संकलन आणि नियंत्रणासाठी ‘हिट अधिकारी’ यांची नेमणूक करावी, आंतर – संस्था समन्वय साधण्याचे प्रयत्न व्हावेत, उष्ण लहरींचे निरीक्षण करण्यासाठी संशोधन आणि माहिती संकलित करावी, उष्णतेच्या आरोग्यावरील होणाऱ्या परिणामांसंदर्भात संशोधनाला चालना दिली जावी, असे मत प्राधिकरणाच्या डॉ. कृष्णा वत्सा यांनी मांडले.

उष्ण लहरींबाबत आणि त्यावरील उपाययोजनांबाबत प्रसिद्धी करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागांसाठी स्वतंत्र आराखडा असावा, तेथील लोकांच्या गरजेनुसार आणि त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रसिद्धी करावी, असे पत्रसूचना कार्यालयाचे अमनदीप यादव यांनी सांगितले.

देशातील प्रत्येक भागात वेगवेगळे तापमान असते. तसेच दोन्हीकडे एकसारख्या तापमानातही लोकांची जीवनपद्धती वेगळी असू शकते, याचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना आखणे गरजेचे आहे. झोपडपट्टी भागात दाटीवाटीत राहणाऱ्या वस्तीत जास्त तापमान असते, आग लागण्याची शक्यता असते, अशा परिस्थितीत कमी खर्चात योग्य उपाययोजना कशा कराव्यात यासाठी संशोधन होणे गरजेचे असून, उष्माघाताने होणारे बळी हे नैसर्गिक आपत्तीत गणले जावे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

आज झालेल्या समारोपीय चर्चासत्रात ‘उष्ण लहरींवर उपाय’ यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग, सहसचिव कुणाल सव्यार्थी, डॉ. कृष्ण वात्सा, सचिव अलोक, महिला हाऊसिंग ट्रस्टचे संचालक बिजल ब्रह्यभट्ट, सीडस् चे संचालक मनु गुप्ता, NRDC चे डॉ. अभियंत तिवारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर, प्रो. रवी सिन्हा यांसह शैक्षणिक संस्थातील तज्ज्ञ, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'दिलखुलास' कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांची मुलाखत

Tue Feb 14 , 2023
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक बाल कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 15, गुरूवार दि. 16 व शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. दरवर्षी 15 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com