– उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या सूचनेनंतर कारवाईला गती
नागपूर :- नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानक परिसरात अवैधरित्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसवर वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाद्वारे कारवाई सुरू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी केलेल्या सूचनेनुसार या कारवाईला गती देण्यात आली आहे.
गणेशपेठ बस स्थानक परिसरात रस्त्यावर पार्क केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे नेहमीच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. बसेसच्या पार्किंगमुळे परिसरात अपघाताची भीती असते. या परिस्थितीचा फटका सामान्यांसह केंद्रीय मंत्र्यांना देखील बसला आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलिस प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत जोशी यांनी गणेशपेठ बस स्थानक परिसरात नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसवर कडक कारवाई करीत अशा बसेसचा परवाना आणि परमीट रद्द केले जावे, अशी सूचना देखील केली होती.
त्यांच्या सूचनेनंतर येथील कारवाईला गती देण्यात आली आहे. अवैधरित्या रस्त्यावर पार्किंग, विना परवाना वाहतूक करणाऱ्या अनेक बसेसवर गणेशपेठ पोलिस स्टेशन वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाद्वारे संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमीत सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिस व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे सांगण्यात आले आहे.