ठाणे :- “आचार्य महाश्रमणजी यांचे सद्भावना, नैतिकता व नशामुक्ती कार्यात मोलाचे योगदान आहे. ‘मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा’ असे मानून कोट्यवधी लोकांना व्यसनातून मुक्त करण्याचे काम त्यांनी केले आहे. स्वयंसेवा, राष्ट्रसेवा, जीवनदान क्षेत्रात त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणे येथे आयोजित आचार्य श्री महाश्रमण चातुर्मास प्रवेश स्वागत व अभिनंदन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, यांच्यासह जैन समाजातील मुनी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आचार्य महाश्रमण यांच्या चातुर्मासासाठी ठाणे येथे आगमनानिमित्त यावेळी मिरवणूक काढण्यात आली.
“राज्य शासन गेल्या वर्षभरात दिवसरात्र काम करून राज्याच्या विकासासाठी कार्यरत आहे. तुमच्या नशामुक्ती कामाप्रमाणेच राज्य शासनाने ‘ड्रग मुक्त मुंबई’ मिशन हाती घेतले आहे. याकामी आपला सहयोग द्यावा”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.