नागपूर :- पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे वितरीत करण्यात येत असलेली अन्नधान्याची किट मोठा आधार ठरत आहे. मनपाद्वारे मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी लक्ष्मीनगर, धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी झोनमधील पूरग्रस्तांना 3370 किटचे वितरण करण्यात आले. उर्वरित पुरग्रस्तांना पुढेही रेशन किटचे वितरण सुरु राहिल.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार पूरग्रस्तांसाठी मनपाद्वारे हजार अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याच्या एकूण 9798 किट वितरीत करण्यात येत आहेत. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मंगळवारी (ता.२६) सकाळी धरमपेठ झोनमधील काचीपुरा भागामध्ये भेट देउन येथील पूरग्रस्तांशी संवाद साधला व त्यांना किटचे वितरण केले. त्यांनी काचीपुरा आणि जवळच्या परिसरातील नागरिकांना किटचे वितरण केले. धरमपेठ झोनमधील काचीपुरा वस्तीसह संगम चाळ, सुरेंद्रगड, हजारीपहाड, सुदाम नगरी या भागांमध्ये उपायुक्त सुरेश बगळे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, झोनल अधिकारी दीनदयाल टेंभेकर यांनी किटचे वाटप केले.लक्ष्मीनगर झोनमध्ये सहायक आयुक्त मिलींद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात किटचे वितरण करण्यात आले. झोनमधील स्वरूप नगर, फकीरावाडी, राहुल नगर, प्रियंका वाडी या भागांमध्ये रेशन किट वाटप करण्यात आले. गांधीबाग झोनमध्ये काशीबाई मंदिर जवळ, मातंगपुरा, मांगपुरा, बजेरीया, नंदाजी नगर, भूतेश्वर नगर, शिवाजी नगर, संत गुलाब बाबा मठच्या मागील परिसरात पुरग्रस्त नागरिकांना किट प्रदान करण्यात आल्या. लकडगंज झोनमध्ये प्रभाग २३ मधील कुंभारटोली भागातील बाधितांना किट देण्यात आले. आशीनगर झोनमध्ये भदन्त आनंद कौशल्यायन पिवळी नदी, संगम नगर, वनदेवी नगर, शिवनगर या भागामध्ये तर मंगळवारी झोनमधील गंगानगर परिसरामध्ये रेशन किटचे वितरण करण्यात आले.पुरग्रस्त परिवारांना आधार म्हणून नागपूर महानगरपालिेकेद्वारे अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याची किट उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेण्यात आला आहे. गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, तेल, तूर डाळ, बेसन, मिरची पावडर, मिठ या जीवनावश्यक साहित्यांचा समावेश असलेली किट नागरिकांना देण्यात येत आहे. या किटमुळे पुढील काही दिवस जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत या पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे.