स्मृती सुगंध

नमस्कार ,

आवडते मज मनापासून ती शाळा 

लावीते लळा माऊली जशी बाळा.

आज 26 डिसेंबर. सोमलवार शिक्षण संस्थेचा संस्थापक दिन. या दिनाचे औचित्य साधून वरील ओळी लिहिण्याचा मोह मला काही आवरता आला नाही. आई मुलाला जसे मनापासून लळा लावून वाढविते, तसेच श्री.निकालस माऊलींच्या कृपा छत्राखाली सोमलवार शिक्षण संस्था प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. आज या संस्थेला एकूण 110 वर्ष पूर्ण झाले. श्री.निकालस महाराजांच्या प्रेरणेने, इसवी सन 1911 साली कै.अण्णासाहेब सोमलवार यांनी सोमलवार शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षण क्षेत्रात एक छोटेसे नवीन रोपटे लावण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे हे कार्य पुढे त्यांच्या मुलांनी चालूच ठेवले. त्यांचे पुत्र भैयासाहेब, दादासाहेब, भाऊसाहेब, मनोहरराव सोमलवार अशा अनेक विद्वान व्यक्तींनी हे कार्य पुढे वाढवत नेले व छोट्याशा रोपट्याचे वृक्षात रूपांतर केले. यापुढे भाऊसाहेबांनी शिक्षण क्षेत्रात भरीव प्रगती करून या छोट्याशा रोपट्याला वटवृक्षात रूपांतरित केले. त्यांनी अहोरात्र कष्ट करून संस्थेमध्ये बालवाडी पासून ते महाविद्यालयापर्यंत संस्थेचा विस्तार केला. परमपूज्य अण्णासाहेबांनी रचलेल्या पायावर कळस रचण्याचे काम भाऊसाहेबांनी केले.

शिक्षण क्षेत्रातील या त्यांच्या महान कार्याकरिता त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा या नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या आज दहा वेगवेगळ्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यांच्या पिढीचा वारसा पुढील पिढी आजही चालवत आहे. विद्यादानाबरोबरच मुलांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार रुजविण्याचे मोलाचे कार्य वर्षानुवर्षे व अनेक पिढ्या ही संस्था आजही करीतच आहे .

अशा या संस्थेत सोमलवार हायस्कूल, खामला शाखेत 10 जुलै 1998 रोजी माझी सहाय्यक शिक्षिका या पदावर नियुक्ती झाली. तो क्षण, तो दिवस माझ्यासाठी सुवर्णयोगच होता असे म्हणावे लागेल, कारण शाळेच्या इमारतीत माझी सर्वप्रथम भेट झाली ती रामदास सोमलवार यांचेसोबत. त्यांनी आत्मियतेने माझी पूर्ण विचारपूस केली. त्यांच्या या विचारपूस करण्याने बोलल्याने मी भारावून गेले. एवढ्या मोठ्या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांची साधी राहणी व आत्मीयतेने केलेली विचारपूस यामुळे मी प्रभावीतच झाले.

त्यांनी मला हवे ते योग्य मार्गदर्शन केले व त्याच दिवशी मुलाखत होऊन माझी त्यांच्या हातून सहाय्य शिक्षिका या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या हाताखाली रोज मी नवीन नवीन काहीतरी शिकत गेले. रोज एक नवीन काहीतरी शिकायला मिळणे ही माझ्यासाठी एक आनंददायी पर्वणीच ठरली, तो काळ म्हणजे माझ्यासाठी सुवर्णकाळ होता. विद्वत्ता, व्यासंग, धैर्य, गुणग्राहकता, संघटन प्रवृत्ती, कार्य कुशलता अशा विविध गुणांचा परिपोश असणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. कोणत्याही शिक्षकातले चांगले गुण हेरून त्यांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करणे, संस्थेच्या विकासाकरिता काय काय करता येईल ही त्यांची तळमळ असते. शालेय क्षेत्रातिल कार्याकरिता त्यांना धडपड मंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ते नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात. इंग्रजी विषयाचे भरपूर ज्ञान त्यांच्याकडनं मला मिळाले व असे निरंतर मिळतच असते. शिक्षक हा सतत शिक्षणप्रिय व विद्यार्थीप्रिय असावा असे ते मानतात.

अशा सोमलवार कुटुंबाशी माझा जवळून संपर्क आला हे माझे मोठे भाग्य समजते. एका लेकीला मजबूत, सुरक्षित, संरक्षक पितृछत्र प्राप्त व्हावे अशी माझी आजची भूमिका आहे ती केवळ त्यांच्यामुळेच, त्याबद्दल मी त्यांचे सदैव आभारी असते. ज्याप्रमाणे वृक्षाची मुळे जमिनीत घट्ट पकडून उभे राहतात त्याचप्रमाणे संस्थेच्या सचिवांचे प्रकाश सोमलवार यांचे व्यक्तिमत्व आहे. ते या शिक्षण संस्थेचे सचिव आहेत. संस्थेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामावर त्यांचे जातीने लक्ष असते. परिस्थितीच्या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन ती परिस्थिती हाताळणे व समोरच्याला समजून घेण्याची त्यांची जी पद्धत आहे ती फार वाखाणण्यासारखी आहे. त्यांच्या या योग्य मार्गदर्शनमुळेच आज शिक्षण संस्थेचा वटवृक्ष होऊन तो आपल्या वेगवेगळ्या शाखा वाढवीत जात आहे.

आज या शिक्षण संस्थेच्या खामला शाखेलाही 50 वर्ष पूर्ण झाले असून सोमलवार हायस्कूल, खामला शाखेने 2016 साली आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला याचा ही मला सार्थ अभीमान आहे. खामला शाखेची सतत प्रगती होत रहावी व शताब्दी महोत्सवही साजरा करावा हीच माझी श्री.निकालस महाराज यांच्या चरणी प्रार्थना आहे.

निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश व संस्थेचे अध्यक्ष एम.एल.सोमलवार ,उपाध्यक्ष रामदास सोमलवार ,मा.सचिव प्रकाश सोमलवार,सहसचिव डॉ.डी.आर.पांडे व संचालक मंडळातील इतर सदस्य या सर्वांच्या कार्यामुळे ही संस्था आजच्या बदलत्या शिक्षण परिस्थितीतही नवनवीन आवाहने झेलून सुद्धा वेगवेगळ्या शाखांचा शुभारंभ करण्यामध्ये महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या शिक्षण संस्थेमध्ये आज विविध शाखांमधले मिळून एकूण दहा हजार विद्यार्थी एकाचवेळी शिक्षण घेत आहेत, हे उत्तम उदाहरण म्हणजेच आपणास नालंदा विद्यापीठाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. ही सुंदर शिक्षण संस्था सदैव प्रगतीपथावर वाटचाल करीत राहो, प्रत्येक गुरुंना व विद्यार्थ्याला त्याच्या प्रगतीपथावर मार्गदर्शक ठरत राहो, हीच निकालस महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते व आजच्या संस्थापक दिनाच्या दिवशी महाराजांना नमन करते.

शब्दांकण –

वैशाली अनिल मोरे

सहाय्यक शिक्षिका,

सोमलवार हायस्कूल, खामला शाखा,

खामला, नागपूर.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com