– ना. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातील तसेच इतर राज्यांमधील नागरिकांनीही हजेरी लावली. कुणी नव्या प्रयोगांचे प्रेझेंटेशन दिले. तर कुणी कृषी, आयटी आदी क्षेत्राच्या प्रगतीसाठी नव्या कल्पना ना. गडकरी यांच्यापुढे मांडल्या. मंत्री महोदयांनी प्रत्येकाशी संवाद साधला व प्रयोगांचे कौतुक केले.
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या अडीअडचणी, समस्या आणि मागण्या थेट मंत्री महोदयांपुढे मांडल्या. विशेषतः दिव्यांग नागरिकांनी कृत्रिम अवयवांच्या उपलब्धतेसाठी निवेदन सादर केले. ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी ‘रोडमार्क फाउंडेशन’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘माझा रस्ता माझा मित्र… माझा रस्ता अपघातमुक्त रस्ता’ या महत्वाकांक्षी उपक्रमाची माहिती ना. गडकरी यांना दिली. या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण मंत्री महोदयांच्या हस्ते झाले. रस्ते सुरक्षा आणि अपघातमुक्त नागपूर या संकल्पनेला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
नागपूर आणि विदर्भातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याबरोबरच नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी सर्व स्तरांवर जनजागृती आवश्यक आहे. त्यादृष्टीने हा उपक्रम उत्तम असल्याची पावती ना. गडकरी यांनी फाउंडेशनचे प्रमुख राजू वाघ यांना दिली. कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी देखील विविध मागण्यांसाठी ना. गडकरी यांना भेटले.