2019 च्या निवडणुकीच्या आधी राजसाहेब नावाची तोफ धडाडली. ‘लाव रे तो व्हिडिओ’ trending वर होते. 2009 मध्ये 13 आमदार, नाशिक महापालिकेत 40 नगरसेवक आणि सत्ता, मुंबई महापालिकेत 27 नगरसेवक अशी लोकप्रतिनिधींची आणि 25 लाखांवर मतांची श्रीमंती असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा का लागली याचे मंथन व्हायला हवे. सभांना गर्दी मात्र या गर्दीचे मतांत परिवर्तन का होत नाही, हा प्रश्न खुद्द राजसाहेबच आपल्या सभांत विचारतात. मनसेच्या निर्मितीनंतर युवा पिढी राज साहेबांकडे आश्वासक नेतृत्व म्हणून बघायला लागली. मात्र वेळोवेळी भूमिकेत बदल करणाऱ्या साहेबांपासून आपसूकच युवा दूर जाऊ लागले. ‘लाव रे तो व्हिडिओ’ ने पुन्हा युवा पिढी सोबतच सत्ताधाऱ्यांच्या बनवाबनवीला कंटाळलेला माणूस पुन्हा एकदा राजसाहेबांकडे वळू लागला. सत्तेच्या विरोधात बोलणारा, सत्तेला प्रश्न विचारणारा जिगरबाज म्हणून राज ठाकरे साऱ्यांना आवडू लागले. केंद्र शासनाच्या फसव्या जाहिरातींचा सभांत पर्दाफाश करणारे राज ठाकरे अचानक चर्चेत आले. सत्ताधाऱ्यांत धडकी भरली. अपेक्षित तेच झाले. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीचा बॉम्ब राज ठाकरेंवर पडला. या बॉम्बचा परिणाम होणार नाही असे वाटले. मात्र अपेक्षाभंग झाला. तोफेचा आवाज कमी झाला. शब्दांची धार बोथट झाली. तेव्हापासून आजपर्यंत अधून मधून राज गर्जना सुरू होत्या. पण त्यात दम नव्हता. आम्ही दुसऱ्यांची लेकरं बाळं आमच्या अंगाखांद्यावर खेळवणार नाही असे काल परवा नाशिकच्या सभेत बोलणारे साहेब आता खेळण्यासाठी संवगडी शोधू लागले. महायुतीच्या घरातली लेकरं बाळं सोबत घेऊन नवा डाव मांडण्याच्या चर्चांना ऊत आलाय. ते झाल्यासारखेच आहे. काल ज्यांच्याविरोधात गळा ते फाडत होते, ते आता स्वच्छ असल्याचा साक्षात्कार राज साहेबांना व्हावा, यातच सारे काही दडले आहे
*उत्तरेत नाराजी*
‘अबकी बार 400 पार’ म्हणणारी भाजपा एक एक जागा खिश्यात घालण्यासाठी कसरत करत आहे. अख्खा देश बघत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आप पक्षाला थोपविण्यासाठी मागील काही महिन्यांपासून टाकलेल्या जाळ्यात शिकार फसवली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना अटक केली. झारखंडमध्ये तोच पत्ता खेळला. बिहारमध्ये नितीशकुमार, महाराष्ट्रात शिंदे, पवारांना (अजित) भाजपने स्वच्छ केले. ईडीचा वार यांच्यावरही होता. त्यांनी सारा स्वाभिमान धाब्यावर ठेवत सत्ता निवडली. ज्यांनी हुकूमशाहीला विरोध केला, सत्तेसोबतची मांडवली स्वीकारली नाही, त्यांना कोठडीची वाट दाखविण्यात आली. राज ठाकरेंचा किस्सा याच ऑपरेशनचा एक भाग आहे. ज्यांच्याकडे जनता बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून बघत होते, त्यांचा दावा आता संपला. पण सत्ताधाऱ्यांचे गणित कुठंतरी चुकतंय. महाराष्ट्रातील एक दोन जागांच्या मोहात उत्तरेतल्या मतदारांची नाराजी भाजप ओढावून घेत आहे. मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या यूपी, बिहार, झारखंड येथील ‘भैय्या’ हे राज ठाकरे यांचे कायम ‘सॉफ्ट टार्गेट’ राहिले आहे. भाषणातून या लोकांवर सातत्याने शाब्दिक हल्ले चढविणाऱ्या राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी खळखट्याक पण केले. उत्तर भारतीय विरुद्ध मराठी माणूस असं युद्ध सुरू झालं. उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरेंविरोधी घेतलेली भूमिका अख्ख्या देशाला माहिती आहे. हेच राजसाहेब जेव्हा अयोध्येला जायला निघाले तेव्हा भाजप सत्तेतील मंत्री ब्रिजभूषण शरणसिंह यांनी प्रचंड विरोध केला. अयोध्येत राज ठाकरेंचा विरोध करणारे बॅनर झळकले. दौरा रद्द करण्याची नामुष्की ठाकरेंवर ओढावली. आता राज यांचा एनडीए मध्ये प्रवेश होतोय. महाराष्ट्रातील 48 पैकी महायुतीत 2 जागा मनसेच्या वाट्याला जातीलही; पण या दोन जागा यूपी मधील 80 आणि बिहार मधील 40 अशा एकूण 120 जागांवर किती परिणाम करतील याचा अंदाज एनडीएला आला नसेल का? राज ठाकरे ज्या दिवशी दिल्ली दरबारी अमित शहांना भेटले त्याच दिवशी उत्तर प्रदेश, बिहार मध्ये राजसाहेब यांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ व्हायरल झाले. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे हे समीकरण जुळणार कसे? राज यांच्या महायुतीत येण्याने उत्तर प्रदेश, बिहार मधील अनेक जागांवर भाजपला फटका बसू शकतो, हा ग्राउंड रिपोर्ट आहे. महाराष्ट्रातील एक टक्का मतांच्या मोहात उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाच टक्क्यांचे नुकसान भाजप करत आहे. चार आणे उचलण्याच्या प्रयत्नांत खिशातून एक रुपया पडत आहे, हे चाणक्य यांच्या लक्षात कसे येत नाही? 400 पार साठी साम, दाम, दंड, भेद वापरणाऱ्या ‘राजा’ची स्थिती केविलवाणी आहे. 400 चा आकडा पार करण्याचा दावा करणाऱ्या मोदींना हे धोके पत्करण्याची गरजच काय? जमीन खालून पोखरलेली तर नाही ना!
*साराच गोंधळ*
महाराष्ट्रात दोन पक्षांचे तुकडे झाले. सारी खिचडी झाली. जागांवरचा दावा कोणी सोडायला तयार नाही. महायुतीतही तेच अन् महविकास आघाडीतील तेच. शिवतारेंसारखी भूमिका घेणारे प्रत्येक मतदारसंघात आहे. प्रत्येक उमेदवारांसमोर ‘ऑप्शन’ आहे. नीलेश लंके यांनी हे ‘ऑप्शन’ अस्त्र वापरले. हाताची घड्याळ काढली. तुतारी हाती घेतली. महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीपर्यंत हे असेच चालणार आहे. नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. याच कारणाने अद्याप पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार ठरले नाहीत. महाविकास आघाडीची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर झाली. मात्र, पहिल्या टप्प्यात विदर्भातील ज्या मतदारसंघात निवडणूक आहे, त्या एकही मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला नाही. खुद्द काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना लोकसभा लढविण्यात इंटरेस्ट नाही. राज्यसभा सदस्यत्वाची तीन वर्षे शिल्लक असताना नव्याने खासदारकी स्वीकारणारे प्रफुल्लभाई आता लोकसभा लढविण्यासाठी आग्रही आहेत. कार्यकर्ते सतरंज्या उचलतच राहणार आहेत. तिकडे धर्मरावबाबा आत्राम घड्याळ मिळाली नाही तर कमळावरही लढण्याच्या तयारीत आहेत. अमरावतीत नवनीत राणा, आनंदराव अडसूळ तिकिटासाठी घमासान सुरू आहे. सत्तेसाठी काहीही चालले आहे. नेहमी जनतेला मूर्ख समजत आहे. यावेळी ‘अंडर करंट’ आहे. अहंकाराचा नाश होणार आहे, कारण मतदार राजा सर्वोच्च आहे.
– आनंद आंबेकर,(कार्यकारी संपादक, देशोन्नती)