▪️12 व 13 ऑगस्ट रोजी दिवसभर आयोजन
▪️कुंजरु, पाथरी, करटोली, कुरडु राजभाज्यांसह मिळणार हंगामी फळे
नागपूर :- जिल्ह्यातील जैवविविधता व राजभाज्या याचे आकर्षण निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. रानभाज्या या केवळ आहार आणि चवीशीच निगडीत नसून अनेक औषधी गुणतत्वे राजभाज्यांमध्ये दडलेली असून पिढ्यांपिढया पासून याच्या सेवनाला आपण अधिक महत्व देतो. प्रत्येकापर्यंत हा रानमेवा उपलब्ध व्हावा व शेतकरी गटांना या रानभाज्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळावी याउद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 12 व 13 ऑगस्ट असे दोन दिवस हा महोत्सव सिव्हिल लाईन्स, जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे. या महोत्सवासाठी 20 स्टॉल्सची व्यवस्था केली जात असल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना कडू दिली आहे. या रानभाजी महोत्सवात केना, कुंजरु, खापरखुटी, पाथरी, कपाळफोडी, टाकळा/तरोटा, मायाळू भाजी, कुरडुची भाजी, शेवळा, करटोली, काटेमाठ, हादगा, दिंडा भाजी, शेवगा, अघाडा, कमळून भाजी, आंबाडी भाजी, तसेच हंगामी फळे येथे ग्राहकांना मिळतील. जास्तीत जास्त नागपुरकरांनी याचा लाभ घेऊन शेतकरी गटांना अप्रत्यक्ष मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.