– भदंत सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना
– भीमगीतांचे सामूहिक गायन
– इंदोरा बुद्ध विहार, संविधान चौक, विमानतळ येथे बाबासाहेबांचा जयघोष
नागपूर :- महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांनी संपूर्ण आयुष्य लोकांचे दु:ख निवारणार्थ व मध्यम, अष्टांग आणि चार आर्य सत्यांची शिकवण देण्यात घालविले. शांती, करुणा, मैत्री, दया, क्षमा, प्रेम, सत्य आणि अहिंसेचा संदेश देत संपूर्ण जगाला मानवतेचा संस्कार त्यांनी दिला. त्यामुळे हा दिवस करुणा, अहसा आणि समानता या मूल्यांची आठवण करून देतो, असे प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. दीक्षाभूमी येथे 2569 व्या जयंतीनिमित्त महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी ससाई बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, च्यावतीने भदंत ससाई यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी येथे बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित अनुयायांनी बाबासाहेबांच्या अस्थिना त्रिवार वंदन केले. यावेळी भिक्खू संघ तसेच उपासक, उपासिकांनी सामूहिक भीम गीत सादर केले.
याप्रसंगी दीक्षाभूमी स्मारक समितीचे एन. आर. सुटे, आनंद फुलझेले, विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्राचार्या दीपा पान्हेकर, प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी तसेच भंते नागसेन, भंते नागवंश, भंते अश्वघोष, भंते संघ, भंते बुद्धघोष, भंते धम्मविजय, भिक्खूनी संघप्रिया, भिक्खूनी संघशीला यांच्यासह रवी मेंढे, नन्ना सवाईथूल, अशोक गोवर्धन, उपासक उपासिका, धम्मसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी भदंत ससाई यांनी इंदोरा बुद्ध विहार, इंदोरा चौक, संविधान चौक आणि विमानतळ येथील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला. चारही स्थळी भीम गीतांचे सामूहिक गायन झाले.