संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील महावीर नगर रहिवासी एका कुटुंबातील विवाहित महिलेला मुलगा व्हावा यासाठी तिच्या पती व सासरी मंडळींनी जादूटोण्याचा वापर करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून न्यायालयीन आदेशान्वये तिच्या पती व सासरी मंडळी विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त महितीनुसार पीडित फिर्यादी महिलेला तिच्या सासरचे घर असलेले महावीर नगर रणाळा येथील एका नामवंत कुटुंबातील पती व सासरी मंडळींनी घरगुती कारणावरून वारंवार अश्लील शिवीगाळ देऊन हातबुक्कीने मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला तसेच भोंदूगिरीवर विश्वास ठेवून पीडित महिलेला मुलगा व्हावा या उद्देशाने तिला मंतरलेले निंब राख पाणी जबरदस्तीने प्यायला लावून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून व गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला .या जाचक त्रासाला कंटाळून पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने न्यायिक हक्कांसाठी कोर्टाची पायरी चढली असता कोर्टाच्या आदेशाने कलम 156(3)प्रमाणे आरोपी पती,सासरा,नणंद व दीर विरुद्ध भादवी कलम 307,498 (अ),294,506,323,34 सहकलम 3,4 हुंडा प्रतिबंधक कायदा अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.