संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी, ता.४ : शेतमजूर बैलबंडीने घराकडे जाण्याकरीता निघाला असतानाच अचानक वीज पडल्यामुळे वखराला बांधलेला एक बैल घटनास्थळीच दगावला. मात्र यात सुदैवाने शेतमजूर व एक बैल बचावला आहे. ही घटना गुरुवार (ता.४) रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील आजनी शिवारात घडली.
नितीन कृष्णराव रडके (रा. आजनी) यांची कामठी लगतच्या आजनी शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीला लागून रघुनाथ रडके यांची शेती आहे गुरूवारी नितिन रडके यांची बैलजोडी घेऊन रघुनाथ रडके त्यांच्या शेतातील मजूर शेतात वखरणीचे काम करत असताना अचानक दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्या मजूराने पावसाचा जोर वाढल्याने आडोश्याला असलेल्या झोपडीत जाण्याची तयारी चालविली. दरम्यान, मजूर मागे फिरत झोपडीत जात नाही तेवढ्यात कडकडणारी वीज वखराला जुंपलेल्या बैलजोडीच्या एका बैलावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा बैल मात्र सैरावैरा पळत सुटला. त्या शेतमजूराला कुठलीही दुखापत झाली नसली तरी, डोळ्यादेखत झालेल्या या घटनेमुळे त्याला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याने घटनेची माहिती शेतमालकाला दिली माहिती मिळताच, शेतमालकाने घटनास्थळी दाखल होत गावचे पोलीस पाटील बळवंतराव रडके व कोतवाल राजू लायबर यांना माहिती दिली. तहसीलदार अक्षय पोयाम यांनी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा व अहवाल सादर करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या असता तलाठी तिजारे मॅडम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून अहवाल पुढील कारवाईस सादर केला. शेतमालकाचे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.