पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी चर्चा
जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची साक्ष
नागपूर दि.7 : दोन वर्षाच्या कोरोना कालावधीतील खंडानंतर पंचायती राज समितीच्या कामकाजाला प्रारंभ झाला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या लेखा पुनर्विलोकन अहवालातील साक्षी घेण्याचे कार्य आज सुरू झाले. यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक दुपारी जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडली.
विधानसभा सदस्य संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वात पंचायती राज समिती सदस्यांनी आज सकाळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चेने कामकाजाला प्रारंभ केला.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात 32 पैकी 16 सदस्य उपस्थित होते. यामध्ये समिती प्रमुख संजय रायमुलकर, आमदार कैलाश पाटील, शेखर निकम, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, देवराव होळी, कृष्णा गजबे, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, निरंजन डावखरे, किशोर आप्पा पाटील, किशोर दराडे, रत्नाकर गुट्टे, महादेव जानकर आदी सदस्यांचा समावेश आहे.
सकाळच्या विश्रामगृहावरील चर्चेत नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, आमदार टेकचंद सावरकर, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, सभापती भारती पाटील, नेमावली माटे यांनी समिती सदस्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कमलकिशोर फुटाणे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर उपस्थित होते.
यावेळी समितीचे प्रमुख आ. संजय रायमुलकर व अन्य सदस्यांनी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये महिला पदाधिकाऱ्यांची संख्या अधिक असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला मोठ्या प्रमाणात महिला सदस्य असणाऱ्या जिल्हा परिषदेचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे कामकाज चालविताना येत असलेल्या अडचणीबाबत व महत्त्वाच्या प्रश्नांबाबत यावेळी पदाधिकाऱ्यांनी समितीपुढे मांडणी केली. या संदर्भातील एक स्वतंत्र निवेदन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी समिती प्रमुखांना सादर केले.
दुपारी अकरानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सन 2015-16 सन 2016-17 च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील नागपूर जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांची साक्ष घेण्याचे कामकाज सुरू झाले.
समिती सदस्य उद्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या पंचायत समित्यांना भेटी देणार आहेत. यावेळी पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा ही समिती घेणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे परीक्षण करण्यासाठी 7 ते 9 एप्रिल या कालावधीत ही समिती नागपुरात असणार आहे.