– राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम ४ डिसेंबरला राबविणार
नागपूर :- नागपूर शहरामध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या यशस्वी अंबलबजावणी संदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम या संदर्भात पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये कुपोषण व रक्तक्षय होऊ नये याकरिता जंतनाशकाची गोळी द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी यावेळी केले.
मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतीक खान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ सुलभा शेंडे, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शिंदे यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम ४ डिसेंबर २०२४ व १० डिसेंबर २०२४ (मॉप अप दिन) ला राबविण्यात येणार आहे. जंताच्या संसर्गामुळे बालकांमध्ये तसेच पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये कुपोषण व रक्तक्षय होतो. तसेच थकवा जाणवतो आणि शारिरीक व मानसिक वाढ पूर्ण होत नसल्याने जंताच्या आजाराचा सामना करावा लागतो. राज्यात जवळपास २८ टक्के बालकांमध्ये जंतदोष आढळून येतो. तो कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जंतनाशक मोहिमेंतर्गत शहर व ग्रामीण भागामधील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींना जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे. ४ डिसेंबर रोजी प्रत्येक शासकीय व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी खाऊ घातली जाणार आहे. याशिवाय, मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रांवरही या गोळ्या उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिली.या प्रसंगी प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड उपस्थित होत्या.