संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– स्वतःपेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला मानणारा युवावर्ग वाढीवर
कामठी :- सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्यानुसार कामठी विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीचे वारे चोहोबाजूने वाहत आहेत,राजकारणात एक नवीन लाट येऊ पाहतेय, तसा तरुणाईचा आणि राजकारणाचा सहवास खूप जुना पण एका नव्या विचारांची नव्या जोमाची येणारी ही नवीन पिढी आज राजकारणाला खऱ्या अर्थाने बदलू शकते पण असे होताना आता फार कमी प्रमाणात दिसत आहे कारण येथील बहुतांश युवापिढी ही आजही या राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडून दादा,काका,भाऊ साहेब यांना प्रमाणापेक्षा जास्त महत्व देऊन स्वतःचे व पर्यायाने संपूर्ण कुटुंबाचे अतोनात नुकसान करत आहे.स्वतःच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा या युवावर्गाला पक्षाची स्थिती आणि स्वतःच्या बापापेक्षा नेत्याला जास्त मानणारा हा बहुतांश युवावर्ग राजकारण्यांच्या हातातील बाहुले बनत चालला आहे.
सक्रिय असलेल्या तरुणांच्या चळवळीला आजचे राजकारण खरच न्याय देते का ,की राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त त्यांच्या कौशल्याचा वापर करून घेताहेत हा एक चिंतेचा विषय होऊन बसला आहे.आजच्या तरुणांनाकडून नेते फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी त्यांना जवळ करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.आजच्या तरुणांच्या हाताला काम नाही आणि याचाच फायदा राजकारणी मंडळी घेत आहेत.नेत्यांचा हेतू कळों ना कळों त्यांच्या सभांना गर्दी करणार !त्यांनी दोस्त म्हणून खांद्यावर हात ठेवला ,म्हणजे त्यांचे आयुष्य फळणार असा गोड गैरसमजात युवावर्ग बेधुंद राजकारणाच्या मोहजालात गुरपटत चालला आहे.
सर्वात महत्वाचा दोष फक्त या राजकारण्यांचा आहे का?नाही!खरं तर दोष आपला सर्वांचाच आहे .आपण आपल्या डोळ्यावर झापड बांधून जगतोय ,स्वतः च स्वतःची फसवणूक करून घेतोय .हेही आज या युवा वर्गाला समजावणे काळाची गरज आहे.प्रत्येक सक्रिय कार्यकर्ता हा उच्च महत्वाकांक्षा असलेला राजकीय नेताच असतो परंतु राजकारण्यांच्या सतरंज्या ऊचलूनच तो जीव काम करीत असतो प्रसंगी आपल्या नेत्याच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या माणसाला तो साम,दाम,दंड ,सर्व पद्धती अवलंबून त्याला आपलाच नेता कसा योग्य आहे हे पटवून देत असतो प्रसंगी मित्रमंडळी ,नातेवाईक अगदी घरातील आई वडीलांशीही तो या नेत्यासाठी वैर पत्करायला एका पायावरती तयार असतो .एवढी राजकारणाची नशा युवा पिढीच्या नसा नसात भिनलेली आहे ज्यावेळेस युवकांच्या लक्षात येते की आपला फक्त वापर झाला आहे त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते हे ज्वलंत वास्तव आजच्या युवा पिढीने लक्षात घेणे गरजेचे आहे .
निदान आता तरी अंध पणाने अनुयायी होणे, झेंडे घेऊन सभेला गर्दी करणे,आपण थांबवणार आहोत का?आता तरी मूल्यांची ,विकासाची लढाई आपण लढणार आहोत का?कुणाचीतरी चमचेगिरी करण्यापेक्षा डोळसपणे समाजाच्या आणि पर्यायी स्वतःच्या विकासासाठी उभे राहणार आहोत का?हा प्रश्न आपण सर्वांनी विचारणे गरजेचे आहे.कुणाच्या वादात आणि कुणाच्या नादात पडण्यापेक्षा नोकरी व उद्योगधंद्यात पडले तर खूप प्रगती होईल याचाही डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे.