नागपूर :- फटाके फोडण्यावरुन दिवाळीच्या दिवशी एका कुख्यात गुंडाचा युवकाने चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता इमामवाड्यात घडली. अमोल ताराचंद वाघमारे (२५, रा. दोन मूर्तीचौक, रामबाग) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शशांक वसंतराव डोंगरे (१८, रा. रामबाग) असे आरोपी युवकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अमोल वाघमारे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर हत्याकांड, चोरी, घरफोडी, गंभीर जखमी करणे तसेच शस्त्र घेऊन फिरण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो वस्तीत नेहमी दहशत पसरवून ह्यदादागिरीह्ण करीत होता. कुणालाही मारहाण करणे, बळजबरी पैसे हिसकावून घेणे, असे प्रकार तो करीत होता. त्याच्या दहशतीमुळे पोलिसांत तक्रार कुणी देत नव्हते. यापूर्वी शशांक डोंगरे याला शिवीगाळ केल्यावरुन दोघांत वाद झाला होता. दिवाळीच्या दिवशी शुक्रवारी रात्री अकरा वाजता शशांक आणि अमोल आपापल्या घरासमोर फटाके फोडत होते. यादरम्यान, शशांकने उडविलेला फटाका अमोलच्या अंगनात पडला. त्यामुळे दोघांत बाचाबाची झाली. अमोलने शशांकच्या कानशिलात लगावली. त्यामुळे चिडलेल्या शशांकने अमोलच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून केला. यावेळी इमामवाडा पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात दिवाळी साजरी करीत होते. गंभीर जखमी अमोलला त्याचा भाऊ मंगेशने मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, अमोलचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शशांकला अटक केली. अमोलचा खून झाल्यानंतर मात्र, वस्तीतील नागरिकांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केल्याची माहिती आहे.