यवतमाळ :- खरीप पणन हंगामांतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी , पुसद, आर्णी, राळेगांव व कळंब या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दि. 15 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.
खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, तालुका खरेदी विक्री समिती राळेगांव व तालुका खरेदी विक्री समिती कळंब या केंद्रांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ज्वारी, बाजरी, मका व रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दि. 15 नोव्हेंबर पर्यंत करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, सातबारा, चालु पिकपेरा सुस्पष्ट झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देवून भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.