विदर्भातील 9,621 ग्राहकांना महावितरणचे अभय

नागपूर :- थकित बिलामुळे वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने जाहीर केलेल्या अभय योजनेत विदर्भातील 91 कोटी 56 लाख 82 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या 11 हजार 520 ग्राहकांनी सहभागी होण्याची ऑनलाईन इच्छा दर्शविली असून त्यापैकी प्रत्यक्ष पैसे भरुन 9,621 ग्राहकांनी या योजनेत आपला सहभाग नोंदविला आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्णसंधी असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने आहे.

संपूर्ण विदर्भाचा विचार करता अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी 10 कोटी 65 लाख 73 हजार रुपये भरले आहेत. विदर्भात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार ग्राहकांनी योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. त्या खालोखाल बुलढाणा जिल्हा (1,525 ग्राहक), गडचिरोली (1,084 ग्राहक), अकोला (600 ग्राहक), अमरावती (571 ग्राहक), गोंदिया (564 ग्राहक), भंडारा (534 ग्राहक), चंद्र्पूर (522 ग्राहक), यवतमाळ (506 ग्राहक), वाशिम (473 ग्राहक) आणि वर्धा (385 ग्राहक) यांचा क्रम लागतो. अर्ज करणा-या 11,520 ग्राहकांपैकी 5,820 ग्राहकांनी पुनर्जोडणीसाठी तर 2,311 ग्राहकानी नवीन वीज जोडणी घेण्याची इच्छा दर्शविली आहे.

नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील नागपूर शहर व नागपूर ग्रामीण या दोन मंडळांमधील अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या 2 हजार ग्राहकांपैकी 1,711 ग्राहकांनी एक रकमी भरणा केला असून केवळ 289 ग्राहकांनी तीस टक्के रक्कम भरून बाकी सहा हफ्त्यात भरण्याचा पर्याय निवडला. अभय योजनेचा लाभ घेतलेल्या 2 हजार ग्राहकांकडून महावितरणला 4 कोटी 66 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. तर वर्धा जिल्ह्यात 446 ग्राहकांनी 33 लाख 91 हजाराचा भरणा केला आहे. विदर्भातील जमा झालेल्या एकूण रकमेपैकी सुमारे 47.30 टक्के रक्कम एकट्या नागपूर परिमंडलात जमा झाली आहे.

महावितरणने 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी वीज ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. त्यानुसार बिलाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांना देयकाची मूळ रक्कम भरल्यास व्याज व विलंब आकार माफ करण्यात येत आहे. ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा एक रकमी केल्यास लघुदाब ग्राहकांना 10 टक्के तर उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के सवलत मिळते. मूळ देयकाच्या 30 टक्के रक्कम भरून उरलेली रक्कम सहा हप्त्यात भरायचीही सोय आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना त्वरित वीज जोडणी मिळते. कृषी ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना ही योजना लागू आहे.

थकबाकीपोटी जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य आहे. ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. तथापि, थेट कारवाई करण्याच्या ऐवजी वीज ग्राहकांना एक संधी देण्यासाठी महावितरणने अभय योजना लागू केली आहे. वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त व्हायची ही सुवर्णसंधी असल्याने महावितरणने जाहीर केलेल्या अभय योजनेचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन देखील महावितरणने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अन्नामृत द्वारे शालेय पोषण आहारात महिन्यातून एक दिवस गव्हाची पोळी

Sat Oct 19 , 2024
– मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पोळी तयार करण्‍याच्‍या मशीनचे उद्घाटन नागपूर :- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे संस्थापकाचार्य ए. सी. भक्‍ती वेदांत स्‍वामी श्रील प्रभुपाद यांचे शिष्‍य लोकनाथ स्‍वामी महाराजांच्‍या मार्गदर्शनात रामानुज नगर, कळमना मार्केट, भरतवाडा रोड येथे स्‍वर्णलता व गोविंद दासजी सराफ (तुमसरवाले) सेंट्रलाइज्‍ड किचनमध्‍ये गव्‍हाची पोळी तयार करण्‍या-या मशीनचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्‍या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com