– निरंजन बोबडे करणार देशभक्तीपर गीतांची प्रस्तुती
नागपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत सोमवार १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘एक शाम शहिदो के नाम’ चे आयोजन करण्यात आले आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे देशभक्तीपर गीतांची प्रस्तुती करतील.
कार्यक्रमामध्ये १०० कलावंतांचा सहभाग हे विशेष आकर्षण राहणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदिका श्वेता शेलगावकर यांचे असणार आहे. सदर कार्यक्रम निःशुल्क असून मोठ्या संख्येत नागरिकांनी या देशभक्तीपर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिकेतर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी मनपा कार्यरत असून, नागपूरकरांनी अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवावा असेही आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.