यवतमाळ :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मागासवर्गीय व आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहे चालविण्यात येत आहे. वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासप्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2024-25 करिता ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी स्थानिक वसतिगृहामध्ये तसेच तालुका स्तरावरील वसतिगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून ऑफलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
संबंधित तालुकास्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन सदर अर्ज आवश्यक कागदपत्रासह दि.31 जुलैपर्यंत संबंधित गृहपाल यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.