मुंबई :- मुंबई ते मोरा दरम्यान सुरु असलेल्या फेरी बोटीचे (लॉन्च)७५ टक्के प्रवासी कमी झाल्याने फेरी बोटीवाल्यांच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याबाबत संबंधितांनी सविस्तर प्रस्ताव द्यावा. या बोटीवरील कामगारांच्या प्रश्नाबाबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मुंबई ते मोरा दरम्यान फेरी बोटीवरील कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याबाबत सदस्य रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.
शासनाकडे अद्याप फेरी बोट चालक कंपन्याच्या अडचणी संदर्भात कुठलाही प्रस्ताव किंवा निवेदन आलेले नाही,मात्र संबंधितांनी त्यांच्या समस्याबाबत निवेदन किंवा प्रस्ताव सादर करावा, त्यावर विचार करुन तत्परतेने उपाययोजना केल्या जातील. या विषयाबाबत तातडीने बैठक घेऊन अडचणी सोडवल्या जातील,असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
या प्रश्नावरील चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, प्रवीण दरेकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला