– पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने २९ कोटींचा निधी मिळाला
यवतमाळ :- उमरखेड तालुक्यातील अमडापूर लघु पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न अखेर आज मार्गी लागला. या प्रकल्पाच्या प्रलंबित पुनर्वसनासाठी २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी उमरखेड तालुक्यातील अमडापूर लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या विषयावर प्रकल्पग्रस्तांच्या भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
या प्रकल्पांतर्गत मौजे महागाव, कुरळी व घमापूर या प्रकल्पबाधित गावातील ३४० पात्र प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अमडापूर प्रकल्पामुळे भोजू नाईक तांडा व कुरळी असे दोन गावे पूर्णतः व धामापूर हे अंशतः अशी तीन गावे बाधित होत आहे. भोजू नाईक तांडा या गावातील ३३ कुटूंबाचे मौजा अमडापूर येथे ५.६१ हेक्टर जमीन संपादीत करून व ८८ कुटुंबाचे मौजा फुलसावंगी येथे ८.३४ हेक्टर जमीन संपादीत करून पुनर्वसन पूर्ण करण्यात आले आहे. मात्र मौजे महागाव, केरळी व घमापूर येथील ३४० कुटुंबांचा प्रश्न प्रलंबित होता.
आज झालेल्या बैठकीत भूसंपादन अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ नुसार या ३४० कुटुंबियांच्या ऐच्छिक पुनर्वसनासाठी २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. यामुळे अमडापूर प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या प्रकल्पग्रस्तांचे योग्यरीत्या पुनर्वसन व्हावे, यासाठी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेकडून राज्य पुनर्वसन प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. प्राधिकरणाच्या आजच्या बैठकीत अमडापूर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा विषय ठेवण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांनी अखेर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २९ कोटींचा निधी मंजूर करून घेतल्याने अनेक वर्षांनी हा विषय मार्गी लागला.
बैठकीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड तसेच वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, वने व भूसंपादन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.