– अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिवन यांनी पंतप्रधानांना विशेषत्वाने आयसीईटी अंतर्गत द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीबाबत दिली माहिती
– आपल्या नव्या कार्यकाळात भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
नवी दिल्ली :- अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिवन यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगती, विशेषत: सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, संरक्षण, महत्वाची खनिजे, अंतराळ यासारख्या महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या (iCET) क्षेत्रातील प्रगतीबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली.
सर्व क्षेत्रांमध्ये वाढत्या द्विपक्षीय भागीदारीचा वेग आणि प्रमाण तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांच्या एककेंद्राभिमुखतेवर पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
पंतप्रधानांनी जी-7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याशी अलीकडेच केलेल्या सकारात्मक संवादाचे स्मरण केले. जागतिक हितासाठी सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी आणि आपल्या नवीन कार्यकाळात ती अधिक उंचीवर नेण्यासंदर्भातील वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.