नागपूर :- देशभरात ज्याप्रकारे लोकशाहीची पायमल्ली सुरु आहे. तसेच संवैधानिक संस्थांवर ताबा मिळवून हुकूमशाही कारभार आहे. यासह कायदा हा सत्ताधारी पक्षासाठी नसतो, असे चित्र देशभरात दिसून येत आहे. याचे जिवंत उदाहरण नुकतेच नागपुरात माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानाजवळ दिसून आले. देशात आदर्श आचार संहिता आणि नागपुरात कलम १४४ लागू असताना भाजपचे सुमारे 40 कार्यकर्ते अश्लिल घोषणाबाजी करत कायदा सुव्यवस्थेचे धिंडोळे काढले. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत होते हे विशेष.
या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी भारतीय निवडणूक आयोग, नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अंबाझरी पोलिस स्थानकात या संदर्भात नुकतीच तक्रार दिली आहे.
लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली. या अनुषंघाने नागपूर पोलिस आयुक्तांनीही १७ मार्च २०२४ रोजी कलम १४४ लागू केली. तरीही भाजपने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या निवास्थानासमोर अवैध पद्धतीने गोंधळ घालण्याची तयारी केली. याअंतर्गत ५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पूर्वनियोजित पद्धतीने मुत्तेमवार यांच्या निवासस्थानाजवळ गोळा झाले. नागपूर लोकसभा निवडणूकीत भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या. त्यावरुन हे सर्व कार्यकर्ते नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरुनच आले असल्याचे मुत्तेमवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
गोळा झालेल्या भाजप कार्यकत्यांनी अश्लिल घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांच्या समोरच भाजपचे पदाधिकारी यांनी विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाविरुद्ध अश्लिल घोषणा दिल्या. त्यांच्या हातात मोठे छापलेले बॅनरही होते. शिवाय या कार्यकर्त्यांनी घराजवळ पुतळाही जाळला. जवळपास तासभर हा सर्व प्रकार घडल्यावरही पोलिस मुकदर्शकाच्या भूमिकेत होते. या घटनेची माहिती वेळेपूर्वीच पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दूरध्वनीवर दिली होती, अशी तक्रार मुत्तेमवार यांनी केली आहे. तसेच लोकप्रतिनिधी कायदा, भादवि, आचारसंहिता कायदा, आणि सीआरपीसीनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणीही मुत्तेमवार यांनी केली आहे.
या घटनेवरुन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ईशाऱ्यांवर पोलिस आय़ुक्त नाचत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोपही तक्रार अर्जात मुत्तेमवार यांनी लावला आहे.