महाकाव्य रामायणातील प्रसंगांच्या सादरीकरणाची मुंबईकर रसिकांवर मोहिनी

– रामायणातील एकेक पात्रातून जीवन प्रणालीची ओळख – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :- भव्य सेट, आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई व डोळ्याचे पारणे फेडणारे महाकाव्य रामायणातील प्रसंग यांनी अक्षरशः उपस्थितांना मोहिनी घातली. सदर कार्यक्रमाच्या वेळी जय श्री राम या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. ड्रोनच्या माध्यमातून यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. रसिक प्रेक्षकांनी यावेळी केलेल्या जय श्री रामाच्या घोषणांनी आसमंत सुद्धा राममयी भक्तीत न्हाऊन निघाला.

गीत, नाट्य, नृत्य आणि वादनाच्या माध्यमातून रामायणातील एकेका प्रसंगाचे अलवारपणे सादरीकरण झाले. महाकाव्य रामायणातील एकेक प्रसंग उलगडत असतांना, रसिक श्रोते या रामायण भक्तीत तल्लीन झाले होते. दरम्यान, रामायण हे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देते. रामायणातील एकेक पात्र जीवन प्रणाली सांगणारे आहे, अशी भावना यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने महाकाव्य रामायण या कार्यक्रमाचे आयोजन गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रामायण मालिकेतील श्रीरामांच्या भूमिकेने प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल, आनंद माडगूळकर, अभिनेत्री रवीना टंडन, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.

महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांनी पुन्हा एकदा ग.दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि स्व. सुधीर फडके (बाबूजी) यांच्या आवाजातून अजरामर झालेल्या गीतरामायणातील विविध प्रसंगांतील गीतांचे सादरीकरण प्रत्यक्ष अनुभवले. स्वयें श्रीराम प्रभू ऐकती, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला ग सखे, चला राघवा चला, स्वयंवर झाले सीतेचे..अशा एकेक अजरामर गीतांचे सादरीकरण यावेळी झाले त्याला रसिकांनी मनापासून दाद दिली. रामायण हे एक असे महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते. या महाकाव्यातील प्रसंगाचे सादरीकरण पाहण्याची संधी रसिकांना मिळाली हा एक वेगळाच आनंद होता.

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ४९६ वर्षांच्या प्रचंड संघर्षानंतर २२ जानेवारी रोजी श्रीरामाची अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा झाली. त्यासाठी महाराष्ट्राचे योगदान लाभले, ही भाग्याची गोष्ट. मंदिरातील महाद्वारासाठी लागणार लाकूड (काष्ठ) हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. रामायणातील जटायू हे महत्वाचे पात्र आहे. त्या जटायू संवर्धनासाठी आपण नाशिक, ताडोबा आणि पेंच येथे तीन जटायू संवर्धन केंद्रे सुरू केली आहेत. रामायणातील एकेक पात्र जीवन प्रणाली सांगणारे आहे. संकटातून सावरण्याचे बळ प्रभू श्रीराम देतात, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दिनांक २१ ते २५ फेब्रुवारी रोजी खारघर येथे अश्वमेध यज्ञ आयोजित केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, नवीन पिढीपर्यंत आपली संस्कृती पोहोचवण्याचे काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे, ही अतिशय चांगली बाब आहे.

आनंद माडगूळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. गीतरामायणाच्या आठवणी खूप आहेत. दिवसेंदिवस गीतरामायणाची लोकप्रियता वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. रामायणाची तत्व आपल्या सर्वांच्या जीवनात भिनली असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे प्रधान सचिव खारगे यांनी केले. सांगीतिक असा कलाविष्कार गीत रामायणाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा कार्यक्रम म्हणजे भारतीय संस्कृतीचे प्रकटीकरण आहे, असे ते म्हणाले.

यावेळी अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अभिनेत्री रवीना टंडन, अदा शर्मा, डेसी शाह, शांती प्रिय, जिया शंकर, अभिनेते अरुण गोविल, अमर उपाध्याय, शिव ठाकरे आदी कलाकार उपस्थित होते. प्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक चवरे यांनी मानले.

या महाकाव्य रामायण सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर, सीतामाईच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत शुभंकर परांजपे या कलाकारांनी सादरीकरण केले. तीनशेहून अधिक कलाकारांनी उत्तमोत्तम सादरीकरण करून रसिकांना खिळवून ठेवले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एयरपोर्ट मेट्रो स्टेशन से विमानतल, विमानतल से एयरपोर्ट मेट्रो स्टेशन एयरकंडिशन शटल बस सेवा २ फरवरी से होगी शुरु

Thu Feb 1 , 2024
*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड* (नागपुर मेट्रो रेल परियोजना) नागपूर :- मेट्रो यात्रा आसान हो ज्यादा से ज्यादा यात्रियों कि इसका लाभ हो इस कडी मे महत्वपूर्ण महत्वपूर्ण कदम उठाते हुए महा मेट्रो,नागपुर महानगरपालिका और मिहान इंडिया लिमिटेड के संयुक्त विद्यमान से एयरपोर्ट मेट्रो स्टेशन-विमानतल-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन के बीच नागपुर महानगरपालिका की एयरकंडिशन २ इलेक्ट्रिक शटल बस २ फरवरी से […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!