– लवकरच हंगेरीत भारतीय विद्यापीठ स्थापन होईल : जोल्ट नेमेथ
मुंबई :- हंगेरी व भारतातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध पूर्वापार दृढ राहिले आहेत. भारतातील सर्व नामांकित कॉर्पोरेट उद्योजकांचे हंगेरीशी उद्योग व्यापार संबंध आहेत. हंगेरी येथे टीसीएस सारख्या कंपन्यांमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळत आहे. उभय देशांमधील संसदीय संबंध दृढ होताना महाराष्ट्रातील विद्यापीठे व हंगेरीतील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण व विशेषतः वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात सहकार्याच्या संधी आहेत. लवकरच हंगेरीत भारतीय विद्यापीठ देखील स्थापन होईल, असा विश्वास हंगेरीच्या परराष्ट्र व्यवहार विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जोल्ट नेमॅथ यांनी आज येथे व्यक्त केला.
जोल्ट नेमेथ यांनी हंगेरीच्या संसदीय समितीचे उपाध्यक्ष डॉ ऍटिला टिलकी यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची गुरुवारी (दि. ११) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
हंगेरी १९९० साली सोव्हिएत युनियनच्या जोखडातून मुक्त झाला. हा लढा आपल्या लोकांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने लढला असे नमूद करून गेल्यावर्षी भारत – हंगेरी राजनैयिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. हंगेरी आपले भारताशी असलेले संबंध पंतप्रधान व्हिक्टर ओरबान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तरावर नेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
जी – २० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर महासत्ता म्हणून उदयाला आला असून जी २० व जी ७ देशांना जोडणारा पूल ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय चित्रपटांमुळे भारत व हंगेरीतील लोकांना जोडल्याचे नमूद करून ‘डंकी’ चित्रपटातील बहुतांश चित्रीकरण हंगेरी देशात झाले असल्यामुळे आपण तो चित्रपट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात आल्यावर आपण ‘गल्ली बॉय’ चित्रपट पाहिल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय संगीत, नृत्य, योग हंगेरीत लोकप्रिय
भारत लवकरच जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असून भारत – हंगेरी संबंध अधिक दृढ करण्याची ही योग्य वेळ असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी नमूद केले.
भारतीय संगीत, नृत्य, आयुर्वेद व योग हंगेरीत लोकप्रिय असून राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने महाराष्ट्र व हंगेरीतील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तसेच शिक्षक आदानप्रदान, संयुक्त पदवी तसेच परस्पर देशात एक सत्र पूर्ण करण्याची सुविधा याबाबत विचार व्हावा अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
रशिया- युक्रेन युद्धानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या ६००० विद्यार्थ्यांना मायदेशी परत येण्यास हंगेरीने मदत केली तसेच हंगेरी येथे उर्वरित शिक्षण करण्यास देखील तयारी दाखवल्याबद्दल राज्यपालांनी हंगेरीचे आभार मानले.
एकट्या मुंबईतून हंगेरीला जाण्यासाठी दरवर्षी १५००० व्हिजा जारी केले जातात व हंगेरीत भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण होत असल्यामुळे आणखी मोठ्या संख्येने पर्यटक हंगेरीला जातील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
बैठकीला हंगेरीचे मुंबईतील वाणिज्यदूत फेरेंस यारी, परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीचे सचिव डॉ रॉबर्ट फ्युरेस व अध्यक्षांच्या सचिव आना लॉफ्लर उपस्थित होते.