– उत्कृष्ट चमूंना उद्घाटन आणि समारोप सोहळ्यात सादरीकरणाची संधी
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत 6 जानेवारी 2024 रोजी चिटणीस पार्क, महाल येथे विविध प्रात्यक्षिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
12 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 जानेवारीला महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आणि 28 जानेवारीला स्पर्धेचा समारोप होणार आहे. या दोन्ही समारंभात उपस्थित असणाऱ्या मा. अतिथींसमोर काही प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. यादृष्टीने 6 जानेवारी 2024 रोजी लेझीम, योग, अॅरोबिक्स, झुंबा, लोकनृत्य (फोक डान्स), गोंधळ, कथ्थक, आदिवासी व पारंपरिक नृत्य, मल्लखांब, रोप मल्लखांब (सामूहीक), मानवी मनोरे, शारीरिक कवायत, सामूहिक दंड शस्त्र प्रदर्शन, सामूहिक बँड पथक/घोष पथक (प्रात्याक्षिक), ग्रुप डान्स, ढोलताशा पथक या विविध प्रात्यक्षिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना उद्घाटन आणि समारोप सोहळ्यात सादरीकरण करण्याची संधी मिळेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 2 जानेवारी 2024 पर्यंत प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि संघाला सन्मानचिन्ह देण्यात येईल. तर विजेत्या संघाला रोख बक्षिस, ट्रॉफी तसेच उत्तेजनार्थ रोख बक्षीस देउन गौरविण्यात येणार आहे.
विविध प्रात्यक्षिकांच्या जास्तीत चमूंनी स्पर्धेमध्ये 2 जानेवारी 2024 पर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागासाठी नियमावली निर्धारित करण्यात आली असून त्यानुसार, उपरोक्त कुठल्याही प्रकारात सहभागी स्पर्धेत विद्यार्थी संख्या कमीत कमी 100 पेक्षा कमी व जास्तीत जास्त 300 च्या वर नसावी. स्पर्धेत कुठलीही शाळा/विद्यालय / महाविद्यालय / मंडळ / सामाजिक संस्था / डान्स क्लास / क्लब सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेच्या निकालाचा अंतिम निर्णय खासदार क्रीडा महोत्सव समिती घेईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा स्थळी आणण्याची सर्व जबाबदारी सहभागी संस्थेची राहील. सर्व प्रात्यक्षिक सादरीकरण 5 मिनीटांपर्यंत मर्यादीत असावे. या स्पर्धेत सहभागी शाळा/महाविद्यालय/क्लब यांच्या पैकी उत्कृष्ट चमुची निवड करुन त्यांनाच खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमात प्रात्यक्षिक सादर करण्याची संधी मिळेल.
स्पर्धेसंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी डॉ. हंबीरराव मोहीते (9422477026), पराग पाठक (7447765356), पंकज करपे (9081361403), डॉ. अंकुश घाटे (9766848057), रवी बारोकर (9226012261), अनिता भोतमांगे (9422190986), पराग बन्सोले (9890985950) यांचेशी संपर्क साधावा.