नागपूर :- राष्ट्रवादीचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक वार केला आहे. अजित पवार यांनी पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेलं विधान चुकीचं आहे. जाहीर निषेध त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो, असं रोहित पवार म्हणालेत.
अजित पवार काय म्हणाले?
पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एक विधान केलं. याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात?, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांचा शाब्दिक वार
युवकांवर कुणी शंका घेता कामा नये. पीएचडी करणारी मुलं कोण आहेत? तर ही गरिबाची मुलं आहेत. पीएचडीसाठी जो वेळ लागतो. त्यासाठीचा पैसा या मुलांकडे नाही. त्यामुळे ते सरकारकडे येत असतील. सरकारची मदत घेत असतील. तर त्यात चूक काय? एखादा श्रीमंताचा मुलगा असता तर तो सरकारकडे आला असता का? ज्या मुलांकडे क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे. पण पैसा नाही, म्हणून ही मुलं सरकारच्या स्कॉलरशीपवर शिकत असतील. तर त्यात काहीही चूक नाही. त्यावर कुणी शंका घेऊ नये. अजितदादा जे बोलले त्याचा निषेध मी करतो, असं रोहित पवार म्हणाले.