Ø जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
नागपूर :- अभ्यासासोबतच चांगले साहित्य वाचनातून नवीन शिकण्याची दृष्टी, काम करण्याची इच्छाशक्ती व विचारशक्ती मिळून जीवनाला यशाचा मार्ग प्राप्त होत असल्याचे मत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्यकत् केले.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस शासनाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा ग्रंथालयात आज ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन प्रंसगी दाते बोलत होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनाेने, माहिती अधिकारी गजानन जाधव यावेळी उपस्थित होते.
दाते पुढे म्हणाले, वाचनातून चांगले विचार व संगतीची श्रीमंती लाभते. भविष्यातील यशस्वी जीवनाची उंची गाठण्यासाठी वाचनातून मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी पुस्तक वाचन करण्याचे तसेच व्यापक ज्ञानप्राप्तीसाठी विविध विषयांवरील व्याख्यानमाला तसेच चर्चासत्रे ऐकण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
जाधव यांनी व्यक्तीमत्व विकासासाठी वाचनाचे महत्व तसेच स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार वाचन-साहित्याची मर्यादा निश्चित करण्याचे सांगितले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोनाेने यांनी प्रास्ताविकेतून ‘वाचन प्रेरणा दिन’ आयोजनाची माहिती दिली. शासनातर्फे विद्यार्थी आणि समाजातील इतर घटकांमध्ये वाचनाची आवड व प्रेरणा निर्माण करणे आणि वाचन संस्कृती रूजवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन ग्रंथालयातील वाचक विद्यार्थींनी स्विटी अंबिलडुके यांनी केले तर उपस्थितांचे आभार निर्गम सहायक माला राठोड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला ग्रंथालयातील अधिकारी व कर्मचारी, वाचक व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे वाचक विद्यार्थी उपस्थित होते.