– नागपूर जिल्हा नझूल कार्यालयाचे सादरीकरण
– नझूल संदर्भात माहिती एका क्लिकवर
नागपूर :- शहरातील नझूलच्या जमीनी, जागा तसेच त्यांच्या वापरासंदर्भातील एकत्रित माहिती ई-नझूल प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. ही प्रणाली वापरकर्त्यांना सहज वापरता येईल व पाहता येईल, अशी तयार करा, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिल्या.
नागपूर जिल्हा नझूल कार्यालयाच्यावतीने ‘ई-नझूल प्रणाली’ तयार करण्यात येत आहे. या प्रणालीचे सादरीकरण बिदरी यांच्या दालनात करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महसूल उपायुक्त राजलक्ष्मी शहा, तहसिलदार नझूल सिमा गजभिये आदी यावेळी उपस्थित होते.
नागपूर शहरात जवळपास 10 हजार 700 ठिकाणी नझुलची जमीन आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नझूल जमीनीवरील अनुदानीत करण्यात आलेल्या भाडे पट्ट्यांचे नुतनीकरण, हस्तांतरण, तारण, नाव समाविष्ठीकरण आदी कार्यवाही करण्यात येते. ही सर्व कार्यपद्धती पारदर्शी आणि सुलभ व्हावी यासाठी विशिष्ट सॉफ्टवेयरचा उपयोग करुन तयार करण्यात आलेल्या ई-नझूल प्रणालीचे सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केले.नझूल जागेबाबत अर्जदाराला स्वत:चे प्रतिज्ञापत्र अपलोड करता यावे यासाठी सोपी पद्धत अवलंबावी, अशी सूचना बिदरी यांनी केली.
संबंधित नझूल जागेचे छायाचित्र अपलोड करणे, त्या जागेचा खसरा क्रमांक, नझूल भुखंड क्रमांक, बांधकाम परवानगी, तारण परवानगी आदींची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यासाठी वाचण्यायोग्य फॉन्ट व फॉन्ट साईज वापरावा अशी सूचनाही त्यांनी केली. या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या काही संज्ञा व त्यांची नावे अधिक सोपी करण्यासंदर्भात सूचना देत या संज्ञांचा अर्थ संबंधित ई-प्रणालीतच दिल्यास अर्जदाराला या प्रणालीचा वापर करणे अधिक सुलभ होईल आणि प्रशासनावरील तानही कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
ई-नझूल प्रणालीच्या संकल्पनेचे व ही प्रणाली प्रत्यक्ष विकसीत करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ही सेवा अधिकाधिक युजरफ्रेंडली बनवून लवकरच ती जनतेसाठी उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. या सुचनांची तातडीने अंमलबजावणी करुन ही सेवा लवकरच जनतेला उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले.