संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-एका अनोळखी निराधार महिलेला दिला आधार
कामठी :- अंगात खाकी वर्दी वेशभूषेत असलेले पोलिस सर्वसामान्य सारखे हाडा मासांचे आहेत,त्यांना ही भावना आहेत ,त्यांच्याही भावना दुखावतात ……..
त्यांच्याही मनाला पाझर फुटते असा परिचय काल नवीन कामठी पोलिसांनी केलेल्या कामठी बस स्थानक परिसरात बेभान फिरकत असलेल्या एका अनोळखी निराधार महिलेला ताब्यात घेत तिला मायेची ऊब देऊन निवारा कक्षात सुरक्षित पोहोचवून कर्तव्यदक्ष भूमिकेतुन दिसून आला.ज्यातून पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
प्राप्त माहिती नुसार मागील दहा दिवसापासून एक अनोळखी निराधार महिलेला हलकीशी मानसिक दृष्ट्या विकलांग स्थितीत कामठी बस स्थानकात फिरकत होती. मिळेल त्या आधारावर दिवस काढत होती.दिवसा या कामठी बस स्थानक चौकातील चहा दुकानात बसून चहा पिऊन वेळ काढत होती तर रात्री मिळेल त्या ठिकाणी आपली रात्र काढायची.मात्र ही निराधार महिला कामठीत कशी आली, हिचे नातेवाईक कोण, हिचा पत्ता काय, ही महिला आपली भूक कशी भागवते अशा बऱ्याच प्रश्नांना पेव फुटले होते त्यातच ही महिला रात्री बेरात्री कुठल्याही आडोशाखाली झोपुन रात्र काढते तेव्हा या महिलेवर कुण्या नराधमाची वक्रदृष्टी पडू नये व हिच्याशी कुठलाही अनैतिक प्रकार न घडावा या जाणिवेतून पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी पुढाकार घेऊन सदर अनोळखी महिलेला ताब्यात घेऊन हिची वैद्यकीय तपासणी करीत तिला नागपूरच्या बुटी कन्या शाळा सीताबर्डी येथील शहरी बेघर निवाऱ्यात सुखरूप सुरक्षित ठेवण्यात आले. पोलिसांनी भावनिक दृष्टिकोनातुन केलेल्या या कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे पोलीस निरीक्षक पोरे, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे तसेच महिला पोलीस कर्मचारीचे येथील सुज्ञ नागरिकातर्फे आभार मानण्यात येत आहे.