मनपा करणार हीट ॲक्शन प्लॅन २०२३ ची अंमलबजावणी, समन्वय समितीची आढावा बैठक

चंद्रपूर  :- चंद्रपूर शहर हॉट सिटी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते.आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरवात झालेली आहे. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हात नागरिक उष्माघाताला बळी पडू नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका हीट ऍक्शन प्लॅन राबविणार आहे. याकरीता २७ फेब्रुवारी रोजी उष्माघात कृती आराखडा समन्वय समितीची बैठक आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगीतले की,२०२० व २१ हे कोरोना काळाचे वर्ष सोडता २०१६ पासून दर उन्हाळ्यात चंद्रपूर मनपातर्फे आरोग्य विभागातर्फे उष्माघात कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ‘ शीत वार्ड ‘ येथे उष्माघाताच्या भरती रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा उष्माघाताने मृत्यू आतापर्यंत झालेला नाही.दरवर्षी तीव्र उष्णता राहत असल्याने दीर्घकालीन नियोजन करावे लागणार आहे.

घर थंड राहण्यास नागरीकांनी कुल रूफ टेक्नोलॉजीचा वापर करावा म्हणजेच उष्णतारोधक पेंट जर घराच्या छतावर मारले तर २ ते ३ डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. मागील वर्षी शहरात २१ जागी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती.यावर्षी त्याहुन अधिक पाणपोईची व्यवस्था स्वयंसेवी संस्थां व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे करण्यात यावी.घर बांधकामाच्या रचनेत उष्णता कमी करण्याच्या दृष्टीने बदल करणे आवश्यक आहे.सावली देणारी मोठी झाडे येत्या जुन -जुलै महिन्यात लावण्यावर भर देण्यात येईल.

बेघर आणि भिकारी यांची व्यवस्था बेघर निवाऱ्यात करणे,अनेकदा भिकारी बेघर निवाऱ्यात येत नाही तेव्हा पोलीस विभागाला सोबत घेऊन नियोजन करणे तसेच मानसीक रुग्ण यांच्यासाठीही ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येईल.काही तात्पुरते व कायमचे प्रवासी निवारे मनपा व स्वयंसेवी संस्थांद्वारे तयार करण्यात यावे. स्वयंसेवी संस्था व दुकानदार यांनी जर आपल्या दुकानासमोर पाण्याच्या कॅन किंवा पाण्याची व्यवस्था करावी,व्यापारी संघटनांनी याचे नियोजन करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

महाकाली यात्रेला निवाऱ्यासाठी शेड तसेच पाण्यासाठी स्प्रिंकलर्सची व्यवस्था दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते तसेच स्प्रिंकलर्स शहरात इतर कुठे लावता येईल याची निश्चिती करणे,ट्रॅफीक सिग्नल दुपारी बंद ठेवणे ,सार्वजनिक खेळांचे आयोजन दुपारी न करणे, सार्वजनिक बगीचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ करणे, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल व व्यापक जनजागृती करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. यावेळी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सदस्यांना हीट ॲक्शन प्लॅन संबंधी विस्तृत माहिती दिली

याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील,नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे,उपअभियंता रवींद्र हजारे, सहा संचालक नगररचना दहीवले,डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. अश्विनी भारत, डॉ. अमोल शेळके, डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ. शरयु गावंडे, डॉ.आरवा लाहिरी,डॉ.शुभंकर पिदूरकर, डॉ.अतुल चटकी,डॉ. नरेंद्र जनबंधू,आयएमए अध्यक्ष डॉ.अमल पोद्दार,जिल्हा सामान्य रुग्णालय पर्यवेक्षक आर.व्ही.खांडरे,रोटरी क्लबचे अजय जयस्वाल,रोटरी क्लब स्मार्ट सिटीच्या विद्या बांगडे, सिव्हिल सर्जन डॉ.नितनवरे,डॉ.रामटेके,सहा.पोलीस निरीक्षक वाहतुक राजेंद्र वाघमोडे,उप कार्यकारी अभियंता सविता गबाळे,डॉ. राहुल नगराळे उपस्थीत होते.

उष्माघाताचा विशेष धोका कुणाला- ५ वर्षापेक्षा कमी व ६५ वर्षावरील नागरीकांना तसेच उन्हात काम करणारे मजूर,प्राणी,अल्कोहोल, धूम्रपान करणारे,शुगर,डायबिटिजचे रुग्ण यांना उष्माघाताचा विशेष धोका असतो.

उष्माघाताची लक्षणे – अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी,अतिसार,भारी घाम येणे, मळमळणे,फिकट त्वचा,हृदयाचे ठोके जलद होतात,पोटाच्या वेदना ही लक्षणे आहेत.

संरक्षणासाठी काय करावे – उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परीणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे, थंड पेये – ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे. विना चप्पल बाहेर जाऊ नये,लहान मुलांना तसेच प्राण्यांना कारमध्ये बंद करून जाऊ नये. थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते ) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बारामतीच्या धर्तीवर कोराडी येथे इएसआयसी रुग्णालय उभारावे

Tue Feb 28 , 2023
– दर महा वेतनात ४.७५% इएसआयसी कपात पण कामगार वंचित – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भुषण चंद्रशेखर यांची मागणी नागपूर :-नुकतेच बारामती येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे इएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याच धर्तीवर कोराडी येथील महानिर्मितीने सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत ७ ते ८ वर्षापूर्वी आरोग्याच्या दृष्टीने दवाखाना बांधला आहे. त्याठिकाणी ‘’इएसआयसी रुग्णालय’’ उभारावे. अशी विनंती पूर्वक मागणी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!