-मनपा-ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचा सहभाग
नागपूर, ता. ३ : स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ अंतर्गत नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग येथे जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी कचरा विलगीकरणाची माहिती देत स्वच्छतादूताकडे विलग स्वरूपातीलच कचरा सोपविण्याचे आवाहन केले.
या उपक्रमादरम्यान मनपाचे कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधला. कचरा विलगीकरण ही काळाची गरज आहे. ओला, सुखा आणि घरगुती धोकादायक कचरा घरातच विलग कसा करायचा, तो कुठल्या रंगाच्या कचरापेटीत ठेवायचा, याबाबत माहिती देण्यात आली. अधिक कचरा जेथे निर्माण होतो अशी हॉटेल, सोसायटी यांनी कंपोस्टिंगच्या माध्यमातून स्वत:च ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी कचरा विलगीकरणाचे महत्त्व समाजवून सांगितले. कचरा विलगीकरणात नागरिकांनी सहकार्य केल्यास नागपूर महानगरपालिकेला पुढील प्रक्रिया करणे सोपे जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल यांनी सांगितले की, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहराला क्रमांक प्राप्त करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. एकूण गुणांपैकी ४० टक्के गुण यावर असल्याकारणाने नागरिकांनी या विषयाला गांभीर्याने घ्यावे. शहर स्वच्छ ठेवण्यात हातभार लावावा, असे आवाहन केले.
या जनजागृती उपक्रमादरम्यान कचरा विलगीकरणाचा संदेश देणारे आणि जनजागृती करणारे पत्रके, फलक, स्टॅण्डीज महाराजबाग येथे लावण्यात आल्या होत्या. या जनजागृती उपक्रमात ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे मेहुल कोसुरकर, श्रिया जोगे, अश्विनी डबले, तुषार देशमुख, सुजय कालबांडे, धनश्री आग्रे, गौरी श्रीखंडकर, दीपक प्रसाद, तृप्ती बांगडकर, साक्षी मुळेकर यांच्यासह मनपाचे अनित कोल्हे, शक्ती शेट्टी, प्रितीश टेंभुर्णे, जयवंत जाधव, राजेंद्र शेट्टी, विशाल नितनवरे, अरविंद जवादे सहभागी झाले होते.