मनपाच्या राणी हिराई सभागृहात 30 डिसेंबर रोजी महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती होती.
शहरातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आदेश निर्गमित केलेले आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, महानगरपालिका आयुक्त या समितीमध्ये सदस्य आहेत.
मनपाचे कर विभाग व निवडणूक विभाग यांच्याकडून जटपूरा, पठाणपूरा, माना टेकडी व बंगाली कॅम्प, शास्त्रीनगर प्रभाग ही नांवे जातीवाचक असल्याचे अभिप्राय प्राप्त झालेले आहे. तसेच स्वच्छता निरिक्षकांची गोंड वस्ती, यादव वस्ती व उडिया वस्ती, इराणी मोहल्ला आदी नावे जातीवाचक असल्याचे सादर केले. ही संपूर्ण नावे बदलून त्या ठिकाणी नवीन नावे देण्यास संदर्भातला विषय आज आमसभेत ठेवण्यात आला होता. मात्र, सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध करीत चंद्रपूर शहरातील कोणतीही नावे बदलण्यात येऊ नयेत, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे पीठासीन अधिकारी यांनी सदर प्रस्ताव नामंजूर करण्याचे निर्देशित केले.