संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बहुजन समाज पार्टी कामठी विधानसभेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कामगार नगर कामठी स्थित आई रमाई यांच्या पुतळ्याला सामूहिक माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले.
याप्रसंगी कामठी-मौदा विधानसभेचे अध्यक्ष इंजि.विक्रांत मेश्राम यांनी आई रमाई यांच्या जीवन चरित्रावर थोडक्यात माहिती देत म्हणाले की रमाई भीमराव आंबेडकर (७ फेब्रुवारी इ.स. १८९८ – २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते, हे नाकारता येत नाही.
मुंबईतील भायखळा मार्केटमधील मासळी बाजार येथे बुधवार ४ एप्रिल १९०६ रोजी रमाईचे भिवासोबत लग्न झाले. रमाईच्या जीवनाच्या अनेक हृदयदायक घटना सांगता येतील. एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी शोकांतिका! पण रमाईच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे.कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व गुण रमाईत असल्यामुळे बाबासाहेबांचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम होते.
बाबासाहेबांच्या जीवनात अत्यंत कठीण काळात रमाईने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच बाबासाहेबांना आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचे जीवन फुलविता आले. २७ मे १९३५ रोजी रमाईचे मुंबई येथे निधन झाले. रमाई व तिच्या अपूर्व त्यागाला त्रिवार अभिवादन वाहण्यात आले.
याप्रसंगी कामठी नगर परिषदेच्या माजी सभापती व नगरसेविका रमाताई नागसेन गजभिये, माजी नगरसेवक विकास रंगारी, माजी महिला कामठी शहराध्यक्ष सुधा रंगारी, निशिकांत टेंभेकर , मनोज रंगारी ,राजन मेश्राम, प्रशांत गजभिये व अन्य कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.