नागपूर :-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशातील गरीब, मध्यमवर्गीयांसह महिला, विद्यार्थी, कामगार या सर्वांच्या स्वयंपूर्णतेला बळ देणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रीया भाजपाचे नेते नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारद्वारे संपूर्ण वर्षभर गरिबांना मोफत धान्य पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्वाचे पाउल या अर्थसंकल्पात उचलण्यात आले असून हस्तकला कलावंतांना बळ देण्याची तरतूद कलावंतांच्या कार्याचा सन्मान आहे, असेही संदीप जोशी म्हणाले.
ग्रीन ग्रोथ अर्थात हरित विकास या संकल्पनेवर पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देत देशाचा विकासाचा आलेख मांडणे ही अर्थसंकल्पातून देशाच्या विकासाची दूरदृष्टी दर्शविते. युवकांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना बुस्टर ठरणार आहे.
हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करून मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना लागू करून मोदी सरकारने वर्षानुवर्षापासून स्वच्छतेचे कार्य करणा-या स्वच्छता सेवकांच्या कार्याचा सन्मान केला आहे. नवीन कर प्रणालीतून ७ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर सवलत देउन मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्याचे कार्य या अर्थसंकल्पात झाले आहे. एकूणच देशातील सर्व गरीब, गरजू, मध्यमर्गीय, व्यापारी, छोटे उद्योजक अशा सर्व स्तरातील घटकांचा विचार करून देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेउन जाणारा अर्थसंकल्प असल्याचे संदीप जोशी यांनी नमूद केले.