एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात
विदर्भातील शंभरावर विद्यार्थी सहभागी
नागपूर : येथील सेंट पलोटी विन्सेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे एक दिवसीय उपग्रह बांधणी कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विदर्भातील शंभरावर विद्यार्थी यात सहभागी झाले होते. डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम स्टुडंट सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन या उपक्रमांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
डॉ. एपीजे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचा हा उपक्रम आहे. डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम स्टुडंट सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन- दोन याअंतर्गत विद्यार्थ्यांना उपग्रह बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले तसेच प्रत्यक्ष पिको उपग्रह बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. राज्यभरातील निवडक शंभर विद्यार्थ्यांना चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष परत वापरात येणारे रॉकेट बनविण्याची संधी या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.
राज्यातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. यात आदिवासी विद्यार्थी, दुर्गम भागातील विद्यार्थी, पोलीस कर्मचाऱ्यांची मुले, विकलांग, विविध महापालिका, जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच गरिब होतकरू विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणादरम्यान भाषेची अडचण येऊ नये यासाठी खास मराठी भाषेतून अडचणी सोडविण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. राज्यात 20 जानेवारी रोजी पुणे, 22 जानेवारी रोजी परभणी आणि 23 जानेवारी रोजी नागपूर येथे एक दिवसीय उपग्रह बांधणीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेला डॅा. एपीजे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे एम.सुरेश, विशाल लिचडे, मिलिंद चौधरी,मनिषा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.