नागपूर :-आज जिकडे तिकडे एकच चर्चा दिसत आहे, ती म्हणजे बहुप्रतिक्षित असलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग आहे. खरोखरच हा मार्ग राज्याचा विकास साधणार आहे. या महा मार्गावरून नागपूर ते मुंबई हा प्रवास आठ तासात पूर्ण होईल अशी संकल्पना समोर ठेवून केलेले नियोजन आणि जलद गतीने तयार झालेला हा गुळगुळीत व भव्य रस्ता. हा रस्ता नसून ही महाराष्ट्रातील लोकांची समृद्धी आहे ती 701 किलोमीटरची. 701 किलोमीटरचा हा महामार्ग 10 जिल्ह्यातून जाणार असून यात विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलढाणा ही जिल्हे जोडली आहे.
विदर्भासाठी विकासाची गंगा जशी या महामार्गाने तयार होणार आहे, तसेच किंवा त्याहूनही थोडा जास्तच विकास वैनगंगा – नळगंगा नदीजोड योजनेतून होणार आहे. या नदीजोडकडे पाहिले तर निश्चितच समृद्धीच्या जोडीला या नदी जोड प्रकल्प वरदान ठरणार आहे. नदीजोडमुळे विदर्भ सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. दोन्ही प्रकल्प हे विदर्भासाठी, विदर्भाची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणार यात शंका नाही.
उद्या देशाचे पंतप्रधान या समृद्धी महामार्गचा काही भाग जनतेच्या सेवार्थ राष्ट्र अर्पण करणार आहे ही आनंदाची बाब आहे. यासोबतच वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाची घोषणा करून विदर्भवासियांचा आनंद व्दिगणित केल्यास विदर्भ नरेद्र मोदीना विसरणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वैनगंगा – नळगंगा नदीजोड फास्टट्रॅकवर नेण्याचे प्रयत्न चालू असल्याने निश्चितच येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळून लगेच कामास सुरुवात झाल्यास जसा समृद्धी गतिमान झाला तसाच हा 426 किमीचा जलमार्ग सुद्धा गतिमान होण्यास वेळ लागणार नाही. या जल मार्गांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा ही जिल्हे असतील. या प्रकल्पामुळे मागासलेल्या विदर्भाला निश्चितच उभारी मिळून शेतकरी आत्महत्याग्रस्त, मागासलेला विदर्भ हा काळा डाग पुसण्याचे भाग्य महाराष्ट्र शासनाला मिळेल.
विकासाचे गणित साधायचे असल्यास या तीन बाबी महत्वाच्या आहेत, त्यात सिंचन योजना, रस्ते योजना व शिक्षण या तिन्हीची सांगड घातल्यास निश्चितच महाराष्ट्राला फायदा होईल. देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्ग हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे बघितले गेलेत, तसेच आता त्यांच्याच मुख्यमंत्री काळात सन सन 2015 ला जल अभ्यासक व समाजसेवी डॉ. प्रवीण महाजन यांच्या मागणीवर वैनगंगा – नळगंगा योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली, आज ती प्रशासकीय मान्यते पर्यन्त येऊन पोहोचली. वैनगंगा-नळगंगा हा प्रकल्पही देवेंद्र फडणवीस यांच्या समृद्धी महामार्ग इतकाच त्यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ते स्वतः याकडे लक्ष देत आहे.
विदर्भाचा कायापालट करण्यास समृद्धी महामार्गा इतकाच नदीजोड प्रकल्प सक्षम ठरणार आहे, त्यामुळेच विदर्भवासियांसाठी आनंदाची बाब आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पाने जो आशेचा दिवा लावलेला आहे, तो तेवत ठेवण्याचे काम महाराष्ट्र शासनाला लवकरच करावे लागणार आहे. जलसंपदा विभागाने या प्रकल्पाला अति जलद प्रकल्प म्हणून जाहीर करून यासाठी एक अधिक्षक अभियंता, नागपूर व अमरावती विभागा करीता एक एक कार्यकारी अभियंता यांचे पूर्णकालीन कार्यालय ओपन करून या प्रकल्पाला गतीमान करावे.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे कायम समृद्धी विदर्भाच्या नशिबी येणार असल्याने हा प्रकल्प समृद्धी इतकाच किंवा काकणभर अतिमहत्त्वाच्या समजून या प्रकल्पाची घोषणा उद्या झाल्यास दुधात साखर असल्याचा आनंद देवून जाईल.